पुढारी ऑनलाईन: चॅटजीपीटीचा एआय चॅटबॉट हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ कॉम्प्युटर आणि आयफोनवर उपलब्ध असणारं हे एआय टूल आता अँड्रॉईड मोबाईलवरही उपलब्ध होणार आहे. चॅटजीपीटी हे मोबाइल अॅप सध्या भारत, अमेरिका, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चॅटजीपीटी मोबाइल अॅप अखेर अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. आयओएस व्हर्जनवर लॉंच झाल्यानंतर हे अॅप दोन महिन्यांनी अँड्रॉइड व्ह्जर्नवर लॉन्च केले गेले आहे. मागील वर्षी ओपनएआय कंपनीने आपला चॅटजीपीटी चॅटबॉट लॉंच केला. यानंतर गुगल आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपले चॅटबॉट लॉन्च केले आहेत.
सॅम ऑल्टमन यांच्या कंपनीने चॅटजीपीटी मोबाइल अॅप हे अँड्रॉइड व्हर्जनवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लॉंच केले जाईल, अशी घोषणा केली होती. विशेष म्हणजे अँड्रॉइड अॅप अशा वेळी लॉंच केले आहे, जेव्हा चॅटजीपीटीच्या ट्रॅफिकमध्ये घसरण होत आहे. परंतु, आता हे अॅप लॉंच झाले असून तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता.
येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अँड्रॉइड अॅप उपलब्धतेचा विस्तार करण्याची ओपनएआयची योजना आहे. सुरुवातीला हे अॅप केवळ आयओएस युजर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आले होते. आता अँड्रॉइडवर देखील हे अॅप लॉंच झाल्यामुळे अनेक अँड्रॉइड युजर्स आता चॅटजीपीटी वापरू शकणार आहेत. हे सर्वांसाठी अॅप विनामूल्य उपलब्ध असणार आहे. चॅटजीपीटीचे मोबाइल अॅप हे सध्या भारत,अमेरिका, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अॅप एकाच वेळी जगभरात उपलब्ध करून देण्याऐवजी टप्प्याटप्प्याने ते रोलआउट करण्यात येणार आहे.