चाफळ हे रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पवित्र झालेले स्थळ आहे. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची याच ठिकाणी प्रथम भेट झाली. ते ठिकाण चाफळपासून दोन किलोमीटरवर शिंगणवाडी येथे उभारण्यात आले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी 36 वर्षे चाफळ व सज्जनगड परिसरात आपले आयुष्य व्यतीत केले. मसूर येथे हनुमानाची स्थापना केल्यानंतर ते चाफळ आणि परिसरात आले. तेथेच त्यांनी वास्तव्य केले. उत्तरमांड नदीच्या दक्षिण तीरावर त्यांनी मंदिर उभारले. मंदिर उभारण्यावेळी त्यांना झालेल्या दृष्टांतामुळे त्यांनी अंगापूरच्या डोहातून श्रीराम आणि अंगलाई देवीची मूर्ती काढली. त्यानंतर श्री रामाची स्थापना चाफळच्या मंदिरात केली. अंगलाईची स्थापना सज्जनगडावर केली.
चाफळच्या श्रीराम मंदिरातील राम मूर्तीच्या दोन्ही हातांत कमळाची फुले आहेत. अन्यत्र असलेल्या मूर्तीच्या हाती धनुष्यबाण आहे. 1648 पासून येथे अखंड रामनवमी उत्सव सुरू असतो. या मंदिर उभारणीस छत्रपती शिवाजी महाराज यांनी सढळ हाताने मदत केली होती. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि 25 पायर्या या मंदिराचे वैभव वाढवतात.
ब्रिटिश राजवटीच्या कालावधीत या मंदिराचे वैभव कमी होत गेले. 1967 मध्ये कोयना भागात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने मंदिराला मोठी हानी झाली होती. त्यावेळचे जिल्हाधिकारी मदननाथन यांनी चाफळच्या राम मंदिरास भेट दिली होती. त्यावेळी प्रसिद्ध उद्योगपती अरविंद शेठ मफतलाल हेही उपस्थित होते. त्यांनी या मंदिराची बिकट अवस्था पाहिल्यानंतर नवीन मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि आजची दिमाखदार वास्तू 1964 मध्ये बांधून पूर्ण झाली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी येथे सीतामाईची यात्रा असते.