पुणे; पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. त्यापार्श्वभूमीवर रविवारी ( दि.1) शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. रविवारी पहाटे पाचनंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी कमी होईपर्यंत वाहतूक बदल राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मुभा देण्यात आली आहे.
बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते शनिवार वाडादरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी टिळक रस्त्याने डेक्कन जिमखान्याकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक) ते महापालिका भवन ते शनिवारवाडादरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जावे. गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौकदरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवाडा, सूर्या हॉस्पिटलमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.