Latest

चांद्रयान-3 घेणार परग्रहावरील मानवाचाही वेध

Arun Patil

श्रीहरिकोटा, वृत्तसंस्था : चांद्रयान-3 ला अंतराळात नेण्यासाठी अद्ययावत बाहुबली रॉकेट म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क-4 (एलव्ही एम-4) सज्ज आहे. या लाँचरच्या यशाचा दर आजवर 100 टक्के आहे. तब्बल सहा मोहिमा या लाँचरने फत्ते केल्या आहेत. चांद्रयान-3 सह ते शुक्रवारी दुपारी अंतराळाकडे झेप घेईल… चंद्रावरील पाणी, चंद्रावरील खनिजे, पृथ्वीची निर्मिती संशोधनासाठी असे अनेक विषय घेऊन ही प्रयोगशाळा चंद्राकडे झेपावणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्य कुठल्या ग्रहावर, उपग्रहावर, तार्‍यावर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, हे मानवाला असलेले कोडे उलगडण्याच्या दिशेनेही चांद्रयान-3 ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

चांद्रयान 24-25 ऑगस्टला चंद्रावर उतरेल… आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरेल.

पुढचे 14 दिवस रोव्हर (प्रज्ञान) हे लँडरच्या चोहीकडे आणि 360 अंशात फिरत राहील. अनेक चाचण्या करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर उमटणार्‍या रोव्हरच्या पाऊलखुणांची छायाचित्रेही लँडरकडून पाठविली जातील. रोव्हर चंद्राच्या ज्या भागावर फिरणार आहे, तेथे आधीही चांद्रयान-1 मोहिमेंतर्गत भारताने मून इम्पॅक्ट प्रोब उतरविले होते… आणि त्याच्याच मदतीने चंद्रावर पाणी असल्याचा शोध 'इस्रोने' (भारताने) लावला होता. येथेच चांद्रयान-2 चे क्रॅश लँडिंगही झाले होते. म्हणजेच उतरताना लँडर कोसळले होते. एक गोड आणि एक कडू अनुभव या भागाने 'इस्रो'ला या आधी दिलेला आहे. शुक्रवारच्या या तिसर्‍या प्रसंगाकडून भारतालाच नव्हे, तर जगालाही खूप अपेक्षा आहेत.

अन्य ग्रहांवरील जीवनाच्या शोधात मोहीम अशी महत्त्वाची…

* चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर नाही. एक प्रोपल्शन मॉड्यूल आहे.
* ते लँडर आणि रोव्हरपासून वेगळे झाल्यानंतरही चंद्राभोवती फिरेल आणि…
* चंद्रावरून पृथ्वीवरील जीवनचिन्हे दिसतात काय, त्याचा अभ्यास करेल.
* हाच डेटा भविष्यात, इतर ग्रह, उपग्रह आणि तार्‍यांवर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, त्याचा शोध घेण्यास उपयुक्त ठरू शकतो.
लँडरला 4 इंजिन; पण

वापर केवळ दोघांचा…

* चांद्रयान-2 अंतर्गत लँडरमध्ये 5 इंजिन होते. चांद्रयान-3 मध्ये लँडरला चार कोपर्‍यांवर चारच इंजिन असतील. चांद्रयान-2 मध्ये लँडरच्या मधोमध वापरलेले पाचवे इंजिन यावेळी काढून टाकण्यात आले आहे.
* चांद्रयान-3 मध्ये लँडिंगदरम्यान दोनच इंजिनचा वापर केला जाईल. आपत्कालीन स्थितीतच उर्वरित दोन इंजिन सुरू केले जातील. पृथ्वीप्रमाणे चंद्रावर वातावरण नसल्याने चंद्रावर लँडिंगवेळी वेगळ्या तंत्राने वेग कमी कमी करत न्यावा लागतो, हे येथे महत्त्वाचे.

लँडर, रोव्हर काय करणार?
सॉफ्ट लँडिंग का आवश्यक?

* लँडरमध्ये 5, रोव्हरमध्ये 2 उपकरणे आहेत. ते तापमान, माती आणि वातावरणातील घटक आणि वायूबद्दलची निरीक्षणे नोंदवतील.
* हे सारे पार पाडायचे तर सॉफ्ट लँडिंग आवश्यक आहे. रोव्हर ते लँडर, लँडर ते ऑर्बिटर आणि ऑर्बिटर ते 'इस्रो'पर्यंत इलेक्ट्रॉनिक सिग्नल मिळत राहावेत म्हणूनही ते आवश्यक आहे.

नवे सेन्सर आणि सुरक्षित लँडिंग!

* उतरताना चंद्राच्या पृष्ठभागावर सेकंदाला 3 मीटर या वेगाने धडकले तरीही लँडर सुरक्षित राहील. लँडरमध्ये 2 सेन्सर आहेत.

* लँडिंग होईल तेव्हा लेझर किरणे चंद्राच्या पृष्ठभागावर पडतील आणि परावर्तीत होऊन परततील. यातून लँडरच्या पुढील वाटचालीची, इकडे-तिकडे होण्याची, खाली-वर होण्याची गती काय आहे, ते कळेल.

* नव्या सेन्सरमुळे 4 कि.मी. बाय 2.5 कि.मी. परिसरात कुठेही लँडिंग करता येईल, हे विशेष! यश यावेळी हुलकावणी देणार नाही, याची प्रार्थनाही करूया आणि खात्रीही बाळगूया…

सायंकाळनंतर लँडर-रोव्हर चाँदभरोसे!

* ऊर्जेसाठी लँडरच्या चहूबाजूंना अतिरिक्त सोलर पॅनल्स आहेत. लँडरच्या ऊर्जासंधारण क्षमतेसह इंजिनची क्षमता वाढवून वाढीव इंधनाचीही तजवीज आहे. लँडिंग लांबले तरी व्यत्यय येणार नाही.

* पृष्ठभागावर उतरल्यानंतर लँडर-रोव्हर चंद्रावरील एकच दिवस काम करू शकतील; पण चंद्रावरील हा एकच दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस आहेत, हे लक्षात घ्या…

* चौदा दिवसांनी जेव्हा रात्रीचे तापमान उणे 180 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. तेव्हा लँडर, रोव्हर काम करू शकतील, याची काहीही खात्री देता येत नाही. पुढचा सूर्योदय होईल, तेव्हा जर सौरकिरणांनी ते चार्ज झाले, तरच पुढची संधी घेता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT