Latest

पवारांच्या बारामतीत भाजप प्रदेशाध्यक्षांचा दणका; काटेवाडीत बैठक, कन्हेरीत घेतले हनुमानाचे दर्शन

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा: पवार कुटुंबीयांचा व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत मंगळवारी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बारामती दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे दोन ठिकाणी क्रेनने भला मोठा हार घालत स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी आपल्या मिशन बारामतीची सुरुवात पवार कुटुंबीयांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, तेथून केली. याशिवाय पवारांच्या काटेवाडी गावात जाऊन त्यांनी बूथ कमिटीशी संवाद साधला.

सोमवारी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक असल्याने रात्री मुक्कामी येणारे बावनकुळे मंगळवारी पहाटे अडीचला बारामतीत दाखल झाले. सकाळी सहापासूनच त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. प्रथम त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीपासून गेली ५५ वर्षे ज्या कन्हेरीतील मारुती मंदिरात नारळ फोडून पवारांच्या सर्व निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात होते, तेथूनच भाजपच्या'मिशन बारामती'साठी बावनकुळे यांनी हनुमानाचा आशीर्वाद घेतला.

पवारांचे गाव असणाऱ्या काटेवाडीत जाऊन त्यांनी तेथे बूथ कमिटीची बैठक घेतली. या कमिटीला उपस्थित सदस्यांनी आम्ही पक्षवाढीसाठी लोकांमध्ये जाऊन मनपरिवर्तन, मतपरिवर्तन घडवून आणू, असा निर्धार बावनकुळे यांच्यासमोर व्यक्त केला. बारामतीत दाखल झाल्यानंतर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपची मिरवणूक निघाली. जिल्हाभरातील पदाधिकारी, बूथ कमिटी प्रमुख त्यात सहभागी झाले होते. कसब्यातील छत्रपती शिवाजी उद्यानापर्यंत मिरवणूक नेण्यात आली.

भाजपच्या पुणे जिल्हा ग्रामीण भागाची संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. दोन सत्रातील या बैठकीत बावनकुळे यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, गोपिचंद पडळकर आदींची भाषणे झाली. दुपारच्या सत्रात त्यांनी पुन्हा बूथ कमिट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी एेकून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. या ठिकाणी इतर पक्षांतील काही कार्यकर्त्यांनी या वेळी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपर्यंत अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT