Latest

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांचा पक्ष ‘हम दो, हमारे दो’ पुरताच उरेल – चंद्रशेखर बावनकुळे

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी टोमणे सभा बंद करून महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा, अन्यथा त्यांच्या सोबत असणारे लोकही साथ सोडून जातील. त्यांचा पक्ष 'हम दो, हमारे दो' या अवस्थेत उरेल असा खोचक सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज दिला. अजित पवार हे कधीच सत्तेत येणार नाही असेही ते म्हणाले.

ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. नवे सरकार आल्यावर राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. हिंदू व इतर धर्मियांच्या सणावर असलेली बंदी उठली आहे. यामुळे राज्यात सर्वत्र हर्षउल्हासाचे वातावरण आहे, असे सांगून बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले," सरस्वतीवर छगन भुजबळ यांनी केलेली टीका दुर्दैवी आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणारे ते राष्ट्रवादीमधील औवेसी आहेत. अजित पवारांना सत्ता गेल्यावर पुन्हा सत्तेची स्वप्न पडायला लागली आहे. अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात राज्यात मोगलशाहीसारखं एकतर्फी सरकार चालवलं आहे. त्यामुळे आता ते कधीच सत्तेत येणार नाहीत.

नाना पटोलेंना सिरीअस घेवू नका !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल नाना पटोले यांना माहिती नाही असे सांगून बावनकुळे म्हणाले, २०१४ ते २०१९ या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्राने त्यांची क्षमता बघितली आहे. फडणवीस यांचे काही प्रायव्हेट व्यवसाय नाहीत, ते पूर्ण वेळ १८ तास जनसेवेसाठी देतात, त्यामुळे ते सहा नाही तर आठ जिल्हे सांभाळू शकतात. पटोले गोंधळलेले आहेत, त्यांचा बॅलन्स सुटला आहे, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे ते अशी विधाने करून गांधी कुटुंबियांजवळ आहोत हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पटोले यांनी बोलणं म्हणजे सूर्यासमोर दिवा दाखवण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.


अधिक वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT