Latest

मोदीजींच्या वादळात उद्धव ठाकरे उडून जातील : बावनकुळे यांचा घणाघात

रणजित गायकवाड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती, असा खणखणीत सवाल करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे घाबरले असून, मोदीजींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील असा घणाघात केला. पाचोरा येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला.

माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मोदीजींचा वारंवार एकेरी उल्लेख टाळायला हवा. पुन्हा-पुन्हा ते जाणीवपूर्वक चुका करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत टीका करून कुठल्याही नेतृत्वाचा अपमान करू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्त्व 150 देशांनी मान्य केले आहे. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. कधी ना कधी याचा स्फोट होईल, असा इशारा त्यांनी दिला.

2014 व 2019 मध्ये ज्यांच्या भरवशावर तुम्ही तुमचे आमदार-खासदार निवडून आणले आणि आज त्यांच्यावर एकेरी टीका करून बेईमानी करत आहात. कितीही मशाल लावा मोदीजींच्या वादळात त्या विझणारच, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.

बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यावर भावासारखे प्रेम केले. एकवेळ भाजपचे काम केले नाही मात्र उद्धवजींचे काम केले. तुमच्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. एकवेळ असा होता की मोदीजी देशातले सर्वोत्तम नेते कसे आहेत याबाबत मंचावरून उद्धव ठाकरे सांगत होते. दरम्यान, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख आपल्या कामासाठी आले होते यात राजकीय चर्चा, हेतू नव्हता असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

पाकिस्तानकडून प्रमाणपत्र, हा तर बाळासाहेबांचा अपमान

उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावे लागतेय. यापेक्षा अधिक दुर्दैव कोणते? ठाकरेंचा भारतीय लोकांवरचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं? याचे प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिले आहे. त्यांना रोज लोकं सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहीत आहे शिवसेना कुणाची? हा खरेतर बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT