पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षात प्रचंड असंतोष निर्माण होईल. इतकी मोठी ठिणगी पडेल की एक दिल के टुकडे हुए हजार.. कोई यहा गिरा, कोई वहा गिरा, अशी परिस्थिती त्यांची निर्माण होईल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 11) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. चिंचवड येथील खासगी हॉटेलमध्ये भाजपच्या चिंचवड, पिंपरी विधानसभा आणि मावळ लोकसभेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बावनकुळे यांनी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) सहमतीने ज्या-ज्या जागा जातील त्या-त्या जागांवर पूर्ण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभेची जागा आम्ही शंभर टक्के जिंकू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, 288 विधानसभा आणि 48 लोकसभेच्या जागांवर भाजप पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी उभी राहील.
मावळ लोकसभेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मागच्या वेळी लढले होते. आता कोण उमेदवार असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, कोण उमेदवार असेल, याची आम्हाला चिंता नाही. 2024 ला तिसर्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे 45 खासदार हात वर करून उभे राहतील.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काय बोलतात, यापेक्षा देशातील जनता काय बोलते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
हेही वाचा