मुंबई ; पुढारी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या विज तोडणीवरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी सरकार विरोधात रान उठवले. याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी पंपांना दिवसा लाईट द्या यासह अन्य मागण्यांसाठी १५ दिवस महावितरणरच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावरून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. (Chandrakant Patil)
यावर विरोधकांनी त्याचे स्वागत करत टोमणे ही दिले आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांनी मिश्किल भाषेत ट्वीट करत सरकारला झुकायला लावल्याचे म्हंटले आहे.
महाविकासआघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए!. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
तसेच, आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा, असा टोला माजी अर्थमंत्री तथा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे.
याचबरोबर चंद्रकांत पाटील म्हणाले की, शैक्षणिक संस्थांमध्ये कोर्टाचा हिजाब बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. यानिमित्ताने मुस्लीम समाजाला माझा आग्रह आहे की, मुस्लीम समाजातील जर कोणी व्यक्ती बेकायदेशीर, असंवैधानिक किंवा देशविरोधी कृत्य करत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा. असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (Chandrakant Patil)
मुस्लीम समाजातील तरुणांची माथी भडकवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या समाजातील त्या पुढाऱ्यांना आणि अनेक राजकीय पक्षांना ही मोठी चपराक आहे. महाराष्ट्रातही मविआ सरकारच्या मदतीने काही संघटना हे प्रकरण तापवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे निंदनीय आहे. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.