Latest

Lok Sabha Elections 2024 | सांगली : चंद्रहार यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचा खुराक?

दिनेश चोरगे

तासगाव : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील ठाकरे शिवसेना गटातर्फे सांगली लोकसभा रिंगणात असून, सध्या त्यांना शरद पवार राष्ट्रवादी गटातून खुराक मिळतो, अशी चर्चा आहे. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार यांच्यात धूमशान सुरू आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने ही जागा आपणच लढणार, असे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा नेमकी कोणाला मिळणार? याबाबत प्रचंड संभ्रम आहे. या परिस्थितीत 'करेक्ट कार्यक्रमा' साठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या समर्थकांनी सांगलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली. तब्बल तासभर खलबते केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खुराकाची चर्चा सुरू झाली आहे. (Lok Sabha Elections 2024)

भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीतच विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महाविकास आघाडीत मात्र जागेसाठी रस्सीखेच सुरू झाली. कोल्हापूरची आमची जागा काँग्रेसला सोडली असे सांगून, त्याबदल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा ठोकला. ऐनवेळी समोर आलेल्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेसनेही सुरुवातीस
लाईटली घेतले, पण ठाकरे गट हा वेळोवेळी सावध चाली चालत उमेदवारीची मांड पक्की करत चालला आहे; हे काँग्रेसजनांच्या लक्षातच आले. लागलीच काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा आम्हीच लढणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार, असे जाहीर केले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेसाठी आक्रमक भूमिका मांडली. याला प्रत्युतर म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही 'काँग्रेसच' आणि 'विशालच' असे जाहीर केले.

गेल्या गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक सुरू होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत अर्ध्यावर बैठक सोडून मिरज येथील संवाद यात्रेसाठी निघून गेले. सांगलीच्या जागेचा तिढा सुटला नाही, त्यामुळे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन आर. आर. पाटील, युवा नेते रोहित पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी कार्यक्रमास जाणे टाळले. उद्धव हे मिरज येथील कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी सांगलीत पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे चार ते पाच समर्थक हॉटेलवर पोहोचले. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून नेत्यांच्यावतीने भेटायला आल्याचा निरोप उध्दव ठाकरे यांना दिला. यानंतर तासभर खलबते झाली. त्यानंतर उद्धव यांनी मिरज येथील मेळाव्यात थेटपणे चंद्रहार पाटील यांची उमेदवारीच जाहीर केली.

हा अप्रत्यक्ष कोण ?

खासदार संजय राऊत असे म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणार असाल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही काय बोलणार ? हा अप्रत्यक्ष कोण?

राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी

भाजपचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल, तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात मला पाठिंबा द्यावा. शिवसेना पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे, मात्र अजूनही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी लोक आहेत. तेच माझ्या पाठिंब्यामध्ये अडथळे आणत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोणाचेही नाव न घेता केला आहे.

सांगलीबाबत मौन का ?

राष्ट्रवादीचा हा नेता भिवंडी, जालना, दक्षिण मध्य मुंबई आदी जागांबाबत बोलतो, मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी मौन का पाळतात? ते सांगली जिल्ह्यातील असताना मौन का? भाजपला त्यांनी काही शब्द तर दिला नाही ना? अशी चर्चा रंगलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT