पुणे, पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. त्यानंतर आता रुंदीकरणासाठी परिसरातील खडक नियंत्रित स्फोटाद्वारे फोडून सेवा रस्त्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वाहतूक पूर्वसूचना न देता थांबण्यिात आली. सोमवारी दुपारी सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
पूल पाडल्यानंतर आठवडाभर उर्वरित कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वाहतूक पंधरा ते वीस मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे, असे पिंपरी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले. चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर तेथे असलेला खडक नियंत्रित पद्धतीने छोटा स्फोट घडवून सोमवारी (3 ऑक्टोबर) फोडण्यात आला. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील मुंबईकडून पुण्याकडे येणारी तसेच पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पंधरा ते वीस मिनिटांसाठी थांबविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना काही काळ कोंडीत अडकावे लागले होते. शाळेतून परतताना मुलांसह पालकही अडकले होते. दुपारी साडेतीननंतर या भागातील वाहतूक पूर्ववत झाली, अशी माहिती देण्यात आली.