महाड श्रीकृष्ण द .बाळ. मागील 36 तासांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या महाड पोलादपूर मधील मुसळधार पावसाने जनजीवन अस्तव्यस्त झाले असून, कोणत्याही क्षणी महाड- पोलादपूर मध्ये पुराचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, सहा पूर्णांक साठ मिलिमीटर पर्यंत पाणी पातळी पोहोचल्याने नगरपालिकेने भल्या पहाटे भोंगे वाजव नागरिकांना सतर्कतेचे इशारे दिले आहेत. तसेच नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
रात्रभर सुरू असलेल्या महाड पोलादपूर मधील पावसाने आभाळ फाटल्याचा प्रत्यय दोन वर्षानंतर पुन्हा एकदा महाड पोलादपूर मधील नागरिक अनुभवत आहेत. मागील 36 तासांपेक्षा जास्त वेळेपासून महाड पोलादपूर मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सावित्री, काळ, गांधारी ,नदीपात्रात पाण्याचे मोठे प्रवाह पहावयास मिळत आहेत. महाड शहराच्या महीकावती मंदिर- भोई घाट येथे स्थानिक यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या पाहणी दरम्यान सद्यस्थितीमध्ये धोक्याची पातळी पाण्याने ओलांडल्याची माहिती नगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजता सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांड्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे असे सुचित करण्यात आले आहे.
दरम्यान रात्रभर सुरू असलेल्या पावसाने आज सकाळी कंपनीमध्ये जाणाऱ्या अनेक गाड्यांमधील कामगारांची संख्या रोडावल्याचे पहावयास मिळाले. दोन वर्षांपूर्वीच्या अनुभवांती नागरिक स्वतःबरोबर कुटुंबाची देखील अधिक काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका प्रशासन एनडीआरएफ पथक व पोलीस प्रशासन येणाऱ्या कोणत्याही आपत्ती प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर बानापुरे यांनी दिली आहे.
पालिका प्रशासनाने अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे सुचित केले आहे. कालपर्यंत पोलादपूर मध्ये एकूण 1350 तर महाडमध्ये अकराशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आज सकाळी या संदर्भातील नोंदी हे वृत्त लिहित असताना प्राप्त झालेल्या नाहीत, मात्र आज सकाळी महाबळेश्वर येथे मागील 24 तासात दोनशे मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच आगामी 48 तासात शासनाने दिलेल्या इशाऱ्यानुसार महाड व पोलादपूर मध्ये सध्या सुरू असलेल्या पाऊस कायम राहिल्यास दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शहरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :