Latest

Coronavirus JN.1 Sub Variant : कोरोनाच्या नव्या JN 1 सब-व्हेरिएंटने वाढवले टेन्शन! केंद्राचे राज्य सरकारांना अलर्ट राहण्याचे निर्देश

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Coronavirus JN 1 Sub Variant : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना एक सूचना जारी केली आहे. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन लोकांच्या सुरक्षेसाठी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका शक्य तितका कमी करता येईल, असे अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.

केरळमध्ये कोरोनाच्या जेएन 1 (JN.1) या नव्या सबव्हेरिअंट आढळला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने ही अॅडव्हायझरी जारी केली आहे. वास्तविक, केरळमधील 79 वर्षीय महिलेमध्ये जेएन 1 सबव्हेरिअंट आढळला होता. त्यापूर्वी, सिंगापूरहून परतलेल्या तामिळनाडूतील एका व्यक्तीमध्येही जेएन 1 हा सब व्हेरिअंट आढळून आला होता. ती व्यक्ती तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी होती, जी 25 ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेली होती.

जेएन 1 (JN.1)चा संसर्ग पाहता केंद्राने तत्काळ राज्यांना सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. कोविड परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे असे आवाहन केंद्राने राज्यांना केले आहे. तसेच राज्यांच्या आरोग्य विभागाला जिल्हानिहाय सारी (SARI) आणि इली (ILI) या आजारांच्या रुग्णांचे नियमितपणे अहवाल द्यावे लागणार आहेत. मोठ्या संख्येने आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचण्या कराव्यात, तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझीटीव्ह नमुने INSACOG प्रयोगशाळांमध्ये पाठविण्याचा सल्ला केंद्राने राज्यांना दिला आहे.

देशात आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आणखी 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5 लाख 33 हजार 316 वर पोहोचली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 4 कोटी 44 लाख 69 हजार 799 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत COVID-19 लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

जेएन 1 (JN.1) या प्रकारावर तज्ञ काय म्हणतात?

जेएन 1 (JN.1) या कोरोनाच्या नवीन सबव्हेरिअंट विषयी माहिती देताना, भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) प्रमुख डॉ एन के अरोरा यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, 'जेएन 1 हे BA.2.86 चा उप-प्रकार आहे. देशात या सबव्हेरिअंटची काही प्रकरणे आढळली आहेत. आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आतापर्यंत एकाही गंभीर रुग्णाची नोंद झालेली नाही.'

JN.1 किती वेगळा आहे?

नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांच्या म्हणण्यानुसार, 'JN.1 हा एक गंभीर इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड आणि वेगाने पसरणारा प्रकार आहे, जो XBB आणि या व्हायरसच्या मागील सर्व प्रकारांपेक्षा स्पष्टपणे वेगळा आहे. ज्यांना यापूर्वी कोविड संसर्ग झाला आहे आणि ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे अशा लोकांना तो संक्रमित करण्यास सक्षम आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT