पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील पेपर एकमध्ये 5 लाख 79 हजार 844 उमेदवार आणि पेपर दोनमध्ये 3 लाख 76 हजार 25 उमेदवार पात्र ठरले. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
28 डिसेंबर ते 7 फेब्रवारी या कालावधीत देशभरातील केंद्रांवर सीटीईटी घेण्यात आली होती. त्यात पेपर एकसाठी नोंदणी केलेल्या 17 लाख 4 हजार 282 उमेदवारांपैकी 14 लाख 22 हजार 959 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यात 5 लाख 79 हजार 844 उमेदवार पात्र ठरले. तर पेपर दोनसाठी नोंदणी केलेल्या 15 लाख 39 हजार 464 उमेदवारांपैकी 12 लाख 76 हजार 71 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील 3 लाख 76 हजार 25 उमेदवार पात्र ठरले आहेत. परीक्षेचा निकाल https://ctet.nic.in आणि https://cbse.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांची गुणपत्रके आणि पात्रता प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये लवकरच उपलब्ध करण्यात येतील, असे सीबीएसईने स्पष्ट केले.