नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बनावट औषध निर्मात्या कंपन्यांवर केंद्राने कारवाईचा बडगा उगारला आहे. या अनुषंगाने पावले उचलत केंद्राने गेल्या ६ महिन्यांमध्ये १३४ औषध कंपन्यांची पाहाणी केली आहे. पाहणी दरम्यान हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक २६ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे कळते. यातील ११ कंपन्यांना औषध उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवाय या राज्यातील दोन औषध उत्पादक कंपन्यांना बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली आहे.
विदेशात भारतीय औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर भारतीय औषध नियामक मंडळ (डीसीजीआय) तसेच स्टेट ड्रग्ज रेग्युलेटर उत्पादन गुणवत्ता तपासणीसाठी अभियान राबवले.तीन वेगवेगळ्या टप्प्यात आतापर्यंत १३४ कंपन्यांची पाहणी करण्यात आली. मानक गुणवत्तेनुसार औषधांचे उत्पादन घेण्यात अपयशी ठरलेल्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. उत्तराखंड २२, मध्यप्रदेश १४, गुजरात ९, दिल्ली ५, तामिळनाडू-पंजाब प्रत्येकी ४, हरियाणा ३ , राजस्थान-कर्नाटक मधील प्रत्येकी २ कंपन्यांचा यात समावेश असल्याचे कळते.
पश्चिम बंगाल, तेलंगणा, पॉंन्डेचेरी, केरळ, जम्मू-काश्मीर, आंधप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी १ औषध कंपनीचे निरीक्षण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी दिलेल्या माहितीनूसार भारतात उत्पादित 'कफ सीरप' मुळे मृत्यूच्या दाव्यानंतर ७१ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले होते.यातील १८ कंपन्यांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.