सांगली : गाडी अंगावर घातल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल 
Latest

सांगली : गाडी अंगावर घातल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

रणजित गायकवाड

आटपाडी येथे रविवारी दुपारी आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात राडा झाला.याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर व अन्य जणांवर रात्री मध्यरात्रीनंतर गुन्हे दाखल झाले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार पळवापळवीच्या कारणावरून आटपाडी येथे रविवारी दुपारी राडा झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. तर पडळकर यांच्या गाडीने उडवल्याने राष्ट्रवादीचे राजू जानकर यांचा पाय मोडला.

याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांचे ड्रायव्हर योगेश विठ्ठल पडळकर (वय २६, रा. पडळकरवाडी, ता. आटपाडी) यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी भगवान पाटील, शिवाजी भगवान पाटील (दोघेही रा. पुजारवाडी, ता. आटपाडी) राजू जानकर (रा. भेंडवडे, ता. खानापूर) बाळासाहेब जगदाळे (रा. करगणी, ता. आटपाडी), राजेश नांगरे (रा. यपावाडी, ता. आटपाडी), विकास मोरे, बाळासाहेब होनराव (दोघेही रा. दिघंची, ता. आटपाडी), हणमंत भानुदास पाटील (रा. पुजारवाडी, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, या आठजणांनी व १५ ते २० जणांनी दोन गाड्या आडव्या लावून फिर्यादीला थांबवून त्यांना जिवंत सोडायचे नाही असे म्हणून हातातील काठ्या व दगडांनी गाडीवर हल्ला केला. जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गाड्यांचे नुकसान केले. या घटनेत योगेश पडळकर व गणेश भुते जखमी झाले.

तर राजू नानासो जानकर (वय २९, रा. भेंडवडे, ता.खानापूर) यांनी आमदार गोपीचंद पडळकर (रा. झरे, ता. आटपाडी) आणि गणेश भुते (रा. भिंगेवाडी, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की राजू जानकर यांनी माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांना भावजीला का मारले असे विचारले. त्यामुळे बंधु गोपीचंद पडळकर यांनी ड्रायव्हर गणेश भुतेला माझा खून करण्याच्या उद्देशाने गाडी अंगावर घालण्यास सांगून खून करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जानकर यांचा पाय मोडला.

दरम्यान, काल रविवारी (दि. ८) झालेल्या या घटनेमुळे आटपाडी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. साठे चौक, साई मंदिर चौक, सांगोला रस्ता चौक परिसरात वाहनांची तपासणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT