Latest

गोवा : संगमेश्वर नदीत कार कोसळून माय-लेकास जलसमाधी

दिनेश चोरगे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  सांगेच्या तारीपांटो पुलावरून मारुती झेंन कार (क्र. जीए 01 आर 9158) संगमेश्वर नदीत कोसळून माय-लेकाला जलसमाधी मिळण्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. मृत आईचे नाव रेखा यादव (वय 35) आणि मुलाचे नाव दिव्यांश नाईक (वय 2) असे आहे. या दोघांचेही मृतदेह कारमध्ये सापडले असून, रेखा यांचे पती मिलिंद नाईक (वय 38) हे बेपत्ता आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब कुयणामळ-सांगे येथील आहे. पाण्यात कोसळलेली कार बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुमारे दहाच्या सुमारास मोठ्या प्रयत्नानंतर कार क्रेनद्वारे बाहेर काढण्यास अग्निशमन दल आणि सांगे पोलिसांना यश आले. रेखा यांचा मृतदेह कारच्या समोरच्या सीटवर आढळला तर दिव्यांशचा मृतदेह मागील सीटवर आढळला. रेखा यांच्या पंधरा वर्षें वयाच्या मुलीने दोन्ही मृतदेह ओळखले आहेत. आपले वडील मिलिंद देवानंद नाईक गाडी चालवत होते, अशी जबानी तिने पोलिसांना दिली असून सांगे पोलिसांनी ते बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. मंगळवारी नौदलाचे पाणबुडे बोलावून संगमेश्वर नदीत त्यांचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांनी सांगितले.

सविस्तर माहितीनुसार, हा अपघात सोमवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घडला. ही कार कुयणामळ येथून तारीपांटोमार्गे सांगेच्या दिशेने येत होती. रात्रीच्या काळोखात ती कार पूल चुकवून थेट पाण्यात पडली. हा अपघात घडताच घटनास्थळी हजारोंच्या संख्येने लोक दाखल झाले होते. घटना घडताच सांगे पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रवीण गावस आणि कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक वैभव नाईक घटनास्थळी दाखल झाले. कुडचडे अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. कार पाण्यात कोसळल्यामुळे कुडचडे येथून वस्त यांची क्रेन मागवण्यात आली. सुमारे एक तास प्रयत्न करून कार बाहेर काढण्यात आली.

महिन्याभरापूर्वी तालांव

पुलावरून कोसळलेल्या कारला जून महिन्यात कुडचडे वाहतूक पोलिसांनी तालांव दिला होता. त्यावरून या कारची व कार मालकाची ओळख पटवण्यात आली आहे. हे कुटुंब कुयणामळ येथील एका बागायतीत काम करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT