डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पॅरिसमध्ये 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फॅशन वीकमध्ये मूळची डोंबिवलीकर असलेल्या डॉ. मैथिली भोसेकर हिने आपल्या सौंदर्याचा ठसा उमटवला आहे. फ्लोरिडा इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत विजयी होऊन डॉ. मैथिली हिने मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट 2022-23 हा किताब पटकावला आहे.
तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती. उच्च फॅशनच्या जगात पॅरिस सारख्या नयनरम्य शहरात डॉ. मैथिली हिने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या प्रत्येक पावलांनी प्रेक्षकांना भुरळ घातली व ती आत्मविश्वासाने चालत राहिली.
हायटेक मोडा निर्मित TIGP कटूर या डिझायनर ब्रँडसाठी डॉ. मैथिली भोसेकरने Le Salon des Miriors या ठिकाणी मॉडेल म्हणून कामगिरी बजावत आपली चांगलीच छाप पाडली. डॉ. मैथिली ही डेंटिस्ट आहे. मॉडेलिंगची आवड तिने मनापासून जोपासली आहे. फॅशन आणि सौंदर्याच्या जगात तिने स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. यासाठी दी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या सीईओ डॉ. अक्षता प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे भारतीय संस्कृती जपणारी डॉ. मैथिली भोसेकर परदेशात राहूनही बहुगुण संपन्न व महत्वाकांक्षी मॉडेल म्हणून चमकत आहे.