Latest

पळून आलेल्या प्रेमीयुगलांना शोधण्यासाठी बुरखाधारी गावात; मात्र पळापळ झाली जुन्या प्रेमीयुगलांची

अमृता चौगुले

भिगवण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उजनीकाठचे राजेगाव तसं पाहिलं तर एरवी शांत, पण गुरुवारी रात्री अख्खं राजेगाव अस्वस्थ झालं होत. या नदीकिनारी 'हर शक्स परेशान सा क्यू है' असं सगळ्यांना वाटलं… कारण परजिल्ह्यातील प्रेमीयुगुलाला शोधायला शेकडो बुरखाधारी व हत्यारबंद कार्यकर्ते गावातून दहशत माजवत फिरत होते.

.. ज्या प्रेमीयुगुलांना हे बुरखाधारी शोधत होते ते राहिले बाजूला, पण गावात अनेक जुनी प्रेमीयुगुले नखशिखांत पुरती हादरली होती. या जुन्या प्रेमीयुगुलांना संध्याकाळच्या भरगारव्यात घाम फुटला व ती सैरावैरा धावत होती त्यामुळे कोणालाच कोणाचा पायपोस नव्हता, की नक्की काय चाललंय ते…. प्रेमीयुगुले प्रचंड घाबरली होती, काहींनी जगावे की नाही अशा विवंचनेतून घरातील कोपरा, माळ्यावरचे छत, उसाचे पीक, काटवण गाठलं होतं.

याचे झाले असे की, नगर जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी व मुलगा पळून येऊन राजेगाव (ता.दौंड) येथे आश्रयास असल्याची माहिती त्या जिल्ह्यातील लोकांना समजली होती. त्यातच या प्रकारणाला 'लव जिहाद'ची किनार म्हणा किंवा अफवा असल्याच्या संशयाने वातावरण गंभीर होते. यातूनच राजेगावच्या ग्रामस्थांनी गुरुवारची रात्र प्रचंड भयभीत अवस्थेत जागवली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दीडशेहून अधिकजण राजेगावात घुसले, त्यामुळे अर्धवट झोपेत असलेल्या ग्रामस्थांना याची चाहूल लागली आणि गावात नक्की काय चालले हेच समजायला तयार नव्हते.

जो तो 'तोडला, मारला, पळा' या आवाजाने हादरून गेला होता. बरं, या बुरखाधार्‍यांना विचारण्याचे धाडस कोणी करायला तयार नव्हते. तरीही काहींनी कानोसा घेत हे सर्व हत्यारबंद लोक पळून आलेल्या प्रेमीयुगुलाच्या शोधार्थ आल्याचे समजले. त्यातही काही अर्धवट ऐकून घेत फक्त कोणत्यातरी प्रेमीयुगुलाची शोधमोहीम असल्याची वार्ता पसरली. मग काय, गावात जेवढी जुनी जुगनी होती ती पुरती हादरली. इकडे ज्या युगुलाचा शोध सुरू होता ते तर हाती लागलेच नाहीत व शोधकर्ते काही वेळानंतर निघून गेलेही. मात्र, जुनी जुगनी मात्र अस्वस्थेने रात्र जागून काढत बसले होते. आज सकाळी याचा उलगडा झाल्यानंतर सर्वांनीच डोक्याला हात लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT