Latest

छत्रपती संभाजीनगर : घरात २२ लाख अन् चावी दारात, निष्काळजीपणामुळे जालाननगरमध्ये घरफोडी

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरात २२ लाखांची रोकड असताना कुलूप लावल्यावर चावी दारात चप्पल स्टँडवर ठेवून कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले. ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान घरी कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्याने घर फोडून २२ लाखांच्या रोकडवर डल्ला मारला. रेल्वे स्टेशन परिसरातील जालाननगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी सातारा ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

मोहम्मद आसिम मोहंमद सईद शेख (२३, रा. फ्लॅट क्र. १४, बी विंग, गुलशन अपार्टमेंट, जालाननगर) असे फिर्यादीचे नाव आहे. मोहम्मद हे ११ नाेव्हेंबरला रोजी अब्दुल साजिद व इतर दोन मित्रांसह मुंबईला फिरायला गेले होते. त्यानंतर मोहम्मद यांचे वडील, आई, भाऊ हे सर्वजण गांधीधाम येथे देवदर्शनासाठी गेले. जाताना त्यांनी घराची चावी दारातील चप्पल स्टँडमध्ये ठेवली आणि आसिमला फोन करून चावी कोठे ठेवली याची माहिती दिली. १५ नोव्हेंबरला सकाळी पावणेसात वाजताच्या दरम्यान आसिम हे मुंबईहून घरी परत आले, तेव्हा कडी लावलेली आणि तोडलेले कुलूप चप्पल स्टँडवर ठेवलेले आढळून आले. आसिम दरवाजा उघडून घरात गेले असता सर्व खोल्याचे दरवाजे उघडे होते. बेडरूममधील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले दोन स्टीलचे डबे बेडवर रिकामे पडलेले होते. आसिम यांनी हा प्रकार तत्काळ वडिलांना सांगितला. तेव्हा एका डब्यात १० लाख आणि दुसऱ्यात १२ लाख रुपये रोकड असल्याचे उघड झाले. ही सर्व रोकड चोरट्यांनी लंपास केली. याशिवाय तिजोरीत आसिम यांच्या आईचे दागिने, वडिलांची व आसिम यांची चेन, ब्रेसलेट होते, अशी माहिती फिर्यादीमध्ये देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास विशेष पथकाचे उपनिरीक्षक सुरज जारवाल करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT