नगर : पुढारी वृत्तसेवा : सैन्य दलाचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या 'बीटीआर'मध्ये गोळीबाराचे प्रशिक्षण सुरू असताना एका बंदुकीची गोळी गजराजनगरमधील तरुणाच्या डोक्यात लागल्याने धावपळ उडाली. गुरुवारी (दि.5) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. किरण मांजरे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तरुणाला लागलेली गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सैन्य दलाच्या 'बीटीआर' या प्रशिक्षण केंद्रालगतच गजराजनगरचा परिसर आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असलेली घरे आहेत.
गुरुवारी सायंकाळी सैन्य दलाचे प्रशिक्षण सुरू असताना गजराजनगरमध्ये फिरत असलेल्या तरुणाच्या डोक्यात बंदुकीची एक गोळी लागली. हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना व एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर सैन्याच्या प्रशिक्षणावेळी हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. जखमी तरुणाला उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सैन्य दलाच्या बीटीआर प्रशिक्षण केंद्रात सराव सुरू असताना गजराजनगरातील तरुणाला बंदुकीची गोळी लागली आहे. तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
– राजेंद्र सानप, सहायक पोलिस निरीक्षक, एमआयडीसी
हेही वाचा :