Latest

Buddhism | बौद्ध हा वेगळा धर्म, हिंदूंना धर्मांतरासाठी परवानगी घेणे आवश्यक, गुजरात सरकारचा आदेश

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : गुजरात सरकारने धर्मांतराबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला गेला पाहिजे आणि हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख धर्मात कोणत्याही धर्मांतरासाठी गुजरात फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट, २००३ च्या तरतुदींनुसार संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे.

बौद्ध (Buddhism) धर्मांतराबाबतच्या अर्जांवर नियमानुसार कार्यवाही होत नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने ८ एप्रिल रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकावर गृह विभागाचे उपसचिव विजय बधेका यांची स्वाक्षरी आहे.

गुजरातमध्ये दरवर्षी दसरा आणि इतर सणांदरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये बहुतांश दलित मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. गुजरात सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, जिल्हा न्यायदंडाधिकारी कार्यालये गुजरात फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्टचा मनमानी पद्धतीने अर्थ लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या अर्जांवर केली जाणारी प्रक्रिया नियमानुसार होत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच काहीवेळेला अर्जदार आणि स्वायत्त संस्थांकडून अशी निवेदन आली आहेत की हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक नाही.

"ज्या प्रकरणांमध्ये पूर्वपरवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केले जातात. त्यावर संबंधित कार्यालये असे अर्ज निकाली काढत आहेत आणि असे नमूद केले जात आहे की घटनेच्या कलम २५(२) नुसार शीख, जैन आणि बौद्ध धर्म हे हिंदू धर्मात समाविष्ट आहेत आणि त्यामुळे अर्जदाराला अशा धर्मांतरासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही." पण "कायदेशीर तरतुदींचा पुरेशी माहिती न घेता धर्मांतरासारख्या संवेदनशील विषयावर अर्जदारांना दिलेली उत्तरे न्यायालयीन कक्षेमध्ये येऊ शकतात," असेही परिपत्रकात म्हटले आहे.

"गुजरात फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्टचा संदर्भ देत, राज्य सरकारने बौद्ध धर्माला स्वतंत्र धर्म मानावा लागेल." असे नमूद केले आहे. या कायद्यानुसार, ज्या व्यक्तीला हिंदू धर्मातून बौद्ध/शीख/जैन धर्मात धर्मांतर करायचे आहे, त्याला विहित नमुन्यात जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसेच, धर्मांतर करणाऱ्या संबंधित व्यक्तीला विहित नमुन्यात जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना तसेच कळवावे लागेल.

तसेच कायदेशीर तरतुदींचा सखोल अभ्यास करून आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून धर्मांतराबाबतच्या अर्जावर निर्णय घ्यावा, असे निर्देश राज्य सरकारने जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.

'रिलीजन ॲक्टचा चुकीचा अर्थ लावला जातोय'

राज्य सरकारच्या गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, धर्मांतरणप्रश्नी स्पष्टीकरण म्हणून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. "काही जिल्हा न्यायदंडाधिकारी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्याच्या अर्जावर निर्णय घेताना कायदा आणि त्याच्या नियमांचा चुकीचा अर्थ लावत होते. तसेच, काही न्यायजिल्हाधिकाऱ्यांना या विषयावर मार्गदर्शन हवे होते. यामुळे आम्ही या परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण जारी केले आहे."

गुजरातमध्ये दलित मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारत आहे. त्यासाठी गुजरात बुद्धिस्ट अकादमी (GBA) ही एक प्रमुख संस्था राज्यात नियमितपणे असे धर्मांतर कार्यक्रमांचे आयोजित करते.

गुजरात बुद्धिस्ट अकादमीचे सचिव रमेश बनकर यांनी राज्य सरकारच्या परिपत्रकाचे स्वागत केले. "यामुळे हे स्पष्ट झाले आहे की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म आहे आणि त्याचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. (Buddhism)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT