सोलापूर : पुढारी वृत्तसेवा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हळहळू इतर राज्यांत पाय पसरू लागला तरी हा पक्ष देशावर राज्य करू शकत नाही, असे भाष्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी सोलापुरात केले.
के. चंद्रशेखर राव हे मंत्री-आमदारांसह विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी सोमवारी सोलापूर दौर्यावर येणार आहेत. या पक्षाविषयी तसेच दौर्याबाबत आपल्याला काय वाटते, असे पत्रकारांनी विचारले असता सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी केंद्रीय गृहमंत्री असताना आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्य निर्मिती केली.
त्यामुळे तेथील राजकीय परिस्थितीविषयीची मला चांगली माहिती आहे. सध्या बीआरएस सर्वत्र पाय पसरत असला तरी देशावर राज्य करू शकत नाही. सोलापूरला तेलंगणाचे मंत्रिमंडळ, आमदार येत असतील तर पाहुणे म्हणून आपण त्यांचे स्वागतच केले पाहिजे. प्रसिद्ध सोलापुरी शिक कबाबचा त्यांनी आस्वाद घ्यावा, असे ते म्हणाले.