अकोला; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी एका महिलेसह दोन व्यापाऱ्यांना ५०५ ग्रॅम ब्राऊन शुगरसह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अफझल खान (वय 24, रा. अकोट फैल, अकोला, महाराष्ट्र) आणि त्याची आई मल्लिका खातून (वय 55) यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे.
या घटनेसंदर्भात रतलामच्या स्टेशन रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किशोर पाटणवाला यांनी माहिती दिली की, त्यांना बसमध्ये हिजाब घातलेली एक महिला आणि लांब केस असलेली एक व्यक्ती इंदूरच्या दिशेने ड्रग्ज घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी फव्वार चौक येथे बस अडवली. बसची झडती घेतल्यानंतर दोन व्यक्ती अंमलीपदार्थांसह आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अर्धा किलोपेक्षा जास्त ब्राऊन शुगर जप्त केली आणि एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपासादरम्यान, रतलाम पोलिसांना समजले की, अफजलविरुद्ध अकोल्यातील अकोट फैल पोलिस ठाण्यात आधीच एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची आई मल्लिका या परिसरात ड्रग्ज विकण्यासाठी ओळखली जाते, असेही रतलाम पोलिसांनी सांगितले.
अधिक वाचा :