नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांना महासंघाचे कामकाज पाहण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) यांनी शनिवार (दि. 13 मे) पासून सिंह यांच्यासह सर्व विद्यमान पदाधिकार्यांना महासंघाच्या कोणत्याही प्रशासनिक, आर्थिक कामकाजात आणि समारंभात सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांच्या जागी एक अस्थायी समिती महासंघाचे सर्व कामकाज पाहणार आहे. जंतर-मंतर येथे पैलवानांची बृजभूषण यांच्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आयओएने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. क्रीडा मंत्रालयाने दि. 24 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या आदेशाचा हवाला यात दिला असून महासंघाने सर्व कागदपत्रे, खात्यांचा तपशील आणि अधिकार तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेेसाठी पाठवण्यात येणार्या एंट्रींचे लॉगीन, वेबसाईटचे संचालन आदी बाबी अस्थायी समितीला सोपवण्यात यावे, असे म्हटले आहे. क्रीडा मंत्रालयाने आयओएच्या समितीला महासंघाची निवडणूक घेण्याची जबाबदारीही सोपवली आहे.
पैलवानांची पदयात्रा
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन करणार्या पैलवानांनी सोमवारी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात पदयात्रा काढून जनतेकडून पाठिंब्याची मागणी केली.
यावेळी पैलवानांनी हातात पोस्टर आणि बॅनर धरले होते. यावर सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह लावले आहे. यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रमुख भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रावण हेही सहभागी झाले होते.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विनेश
फोगट हिने सांगितले की, येत्या 21 तारखेला पैलवान मोठा निर्णय घेऊ शकतात. यावेळी तिने 9053903100 या मोबाईल नंबरही सार्वजनिक केला, त्यावर मिस कॉल देऊन पैलवानांना पाठिंबा देण्याची विनंती केली.