कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असून कोल्हापूर व कागल येथे भराव टाकून पूल न बांधता पिलरवरच पूल उभा करण्याचे आदेश केंद्रीय परिवहन व रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय हायवे अॅथॉरिटीचे चेअरमन संतोष यादव व राष्ट्रीय हायवे अॅथॉरिटी, मुंबईचे मुख्य अभियंता अंशुमन श्रीवास्तव यांना दिले आहेत. यामुळे भराव टाकून पूल उभारण्याचे काम रद्द होऊन पिलरवरच पूल होईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दै. 'पुढारी'ने 30 नोव्हेंबर रोजी 'महामार्गावर धरण, कोल्हापूरकरांचे मरण' अशा ठळक मथळ्याखाली या संबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची ना. गडकरी यांनी तातडीने दखल घेत अवघ्या दोन दिवसांतच पहिला निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी केला आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील पुणे-कागलपर्यंतच्या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर व कागल येथे भराव टाकून पूल बांधण्याचे नियोजन होते. याला नागरिकांचा विरोध आहे. भराव टाकल्यामुळे जवळपास निम्म्यापेक्षा अधिक कोल्हापूर शहर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. दै. 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर भराव न टाकता पिलरवरच पूल बांधावा यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे नागपूर येथे भेट घेतल्यानंतर गडकरी यांनी कोल्हापूर व कागल येथे भराव न टाकता पिलरवरच पूल बांधण्याचे आदेश दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुश्रीफ म्हणाले, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे ते कोल्हापूर रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा यासंदर्भात महामार्गावरील कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांची व्यापक बैठक झाली होती. चौपदरी महामार्ग करण्यात आला. त्यावेळी टाकण्यात आलेल्या भरावामुळे शहरवासीयांना पुराचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे तर महामार्गावर पुराचे पाणी येऊ लागल्यामुळे वाहतूक ठप्प राहू लागली. हे टाळण्यासाठी शिरोली ते पंचगंगा पूल आणि तावडे हॉटेल ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंत भराव टाकून उंची न वाढवता पिलर टाकून पूल करणे आवश्यक असल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी कागलपासून तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत आपण अधिकार्यांना घेऊन महामार्गाची पाहणी
देखील केली होती. शिरोली ते पंचगंगा पूल हे अंतर साधारणपणे 2 हजार 400 मीटर इतके आहे. महापुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मात्र केवळ
4 बाय 3 मीटरचे 8 तर 2 बाय 2.5 मीटरचा 1 असे नऊ टनेल बॉक्स बांधण्यात येणार आहेत. यातून पाणी कसे जाऊ शकेल? आताच महापूर आल्यास जवळपास निम्मे शहर पाण्याखाली जाते. आता आणखी भराव टाकल्यास पुराचा धोका आणखी वाढून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी शिरोली ते पंचगंगा पूल आणि तावडे हॉटेल ते रेल्वे उड्डाणपूल याठिकाणी पिलरवरच पूल उभा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्या बैठकीत सांगण्यात आले. तरीही त्याकडे अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कागलमध्येही भराव टाकण्यास आपण विरोध केला आहे. त्याठिकाणीही भराव न टाकता पिलरवर पूल उभा करण्याची मागणी आपण केली होती. गडकरी यांनी तत्काळ तसे आदेश अधिकार्यांना दिले.
मंत्री गडकरी यांनी आदेश दिल्यानंतर त्याची कल्पना आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांना दिली आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
पुराचा धोका टळणार
भराव न टाकता पिलरवर पूल उभारल्यास पुलाखालून पाणी जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुराचा धोका टळणार आहे. भराव टाकून पूल करण्यात आलेल्या अनेक गावांमध्ये पुराच्या काळात पाणी गावामध्ये साचून राहात असल्याचे पाहिले आहे. असे मुश्रीफ म्हणाले.
दै. 'पुढारी'मुळे प्रश्न मार्गी
शहरातील विविध प्रश्नांवर दै. 'पुढारी'ने आजपर्यंत सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामध्ये थेट पाईपलाईन असेल, विमानतळ असेल किंवा अलीकडील काळात झालेले टोलचे आंदोलन असेल. यामध्ये 'पुढारी'ने सातत्याने आवाज उठविल्यामुळेच यश आले आहे. भराव टाकून उभारण्यात येणार्या पुलामुळे शहराला पुराचा धोका वाढणार होता. यासंदर्भात 'महामार्गावर धरण? कोल्हापूरकरांचे मरण' असे वृत्त दि. 30 नोव्हेंबर रोजी दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध करून प्रथम आवाज उठविला. त्याची दखल घेऊन मुश्रीफ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी भराव टाकण्याऐवजी पिलरवर पूल उभारण्याचे आदेश दिल्याने महापुराचा मोठा धोका टळणार आहे. यावरून शहरातील कोणत्याही प्रश्नावर दै.'पुढारी'ने आवाज उठविल्यानंतर तो मार्गी लागतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गडकरी म्हणाले, मी एकदा सांगितल्यानंतर ते होणारच!
मुश्रीफ यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील हीरकमहोत्सवी कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात माहिती दिली. यावर गडकरी म्हणाले, प्रेझेंटेशनच्या वेळी जर भराव न टाकता पूल बांधण्याची सूचना करण्यात आली असेल आणि नागरिकांचाही भराव टाकण्यास तीव— विरोध असेल तर तसेच होणे आवश्यक होते. अधिकार्यांच्या या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी तत्काळ राष्ट्रीय हायवे अॅथॉरिटीच्या अधिकार्यांना फोन लावले आणि कोल्हापूर व कागल येथे भराव न टाकता पिलरवर पूल करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात जर काही बदल दिसला नाही किंवा त्याप्रमाणे काम झाले नाही तर दिल्लीत मला भेटा. परंतु तशी वेळ तुमच्यावर येणार नाही. आपण एकदा सांगितल्यानंतर ते होणारच, असे गडकरी यांनी स्पष्टपणे आपणास सांगितल्याचे मुश्रीफ म्हणाले. अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर तुम्ही नागरिकांना सांगून टाका, भराव घालून पूल बांधणार नाही तर पिलरवरच पूल उभा राहील, असे गडकरी यांनी सांगितल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
संदर्भासाठी मुश्रीफ यांच्या हाती 'पुढारी'ची कात्रणे
पत्रकार परिषदेत माहिती देत असताना संदर्भासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दै.'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचाच आधार घेतला.