कोल्हापूर, दिलीप भिसे : घातक शस्त्रांच्या धाकावर समाजात अस्थिरता निर्माण करणार्या समाज-कंटकांची दहशत मोडून काढा, अशा स्पष्ट सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाचही पोलिस अधीक्षकांना सोमवारी दिल्या आहेत. शस्त्रास्त्रांसह अमली तस्करांविरुद्ध शोधमोहीम राबवून 11 पिस्तुलांसह गावठी कट्टे, नंग्या तलवारींसह हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
कर्नाटकातील निवडणकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रांतर्गत अधिकार्यांनी सीमाभागात विशेष मोहीम राबवून 2 हजार 890 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
4 कोटी 41 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
88 लाखांची रोकड, गांजा, देशी-विदेशी दारू, अमली पदार्थांसह 4 कोटी 41 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविणार्या सात संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांसह सराईत गुन्हेगारांकडून गेल्या काही दिवसांत 11 पिस्तुले, गावठी कट्ट्यांसह काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.
महामार्गावर रात्रंदिवस नाकाबंदी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात तपासणी पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. महामार्ग, राज्यमार्ग तसेच जिल्हा मार्गांवर रात्रंदिवस पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
88 लाखांची रोकड, दारूसाठा जप्त
सोलापूर हद्दीत 88 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. असे सांगून विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, 20 लाख 30 हजार किमतीची 35 हजार लिटर दारू हस्तगत करण्यात आली आहे. सुमारे 2 कोटी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहेे.
दै. 'पुढारी'च्या वृत्ताची दखल!
'कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात घातक शस्त्रांचा खुला बाजार' या दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी दखल घेतली. सोमवारी सकाळी परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीणमधील पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात 'कोम्बिंग ऑपरेशन' करून गुंडागर्दी करणार्या समाजकंटकांची झाडाझडती घ्यावी, शस्त्रसाठ्यांचा छडा लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत.