Latest

Brazil Presidential Election : लुला दा सिल्व्हा यांनी ब्राझिलमध्ये फडकवला लाल बावटा! राष्ट्रपती पदाची निवडणूक तिसऱ्यांदा जिंकली

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : brazil presidential election : द. अमेरिका खंडातील महत्त्वाच्या समजल्या जाणा-य ब्राझील देशाच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. चार वर्षांच्या प्रखर उजव्या विचारसरणीच्या राजकारणानंतर ब्राझील पुन्हा एकदा डाव्या विचारसरणीकडे वळला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक निकालावरून हे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस रोचक होत गेलेल्या या निवडणुकीत तेथील जनतेने उजव्या विचारसणीच्या सत्तेला उलथवून लावत त्या ठिकाणी डाव्या विचारसणीच्या पक्षाकडे सत्ता सोपवली आहे. वर्कर्स पार्टीचे नेते आणि माजी राष्ट्रपती लुईझ इंसिओ लुला दा सिल्व्हा यांनी विद्यमान राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांचा या अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव केला. याचबरोबर ते तिस-यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत.

ब्राझीलमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. तेथील निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, एकूण ९८.८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी लुला दा सिल्व्हा यांना ५०.८ तर बोल्सोनारो यांना ४९.२ टक्के मते मिळाली. या निकालाच्या आधारे लुला यांना विजयी घोषित करण्यात आले. (Brazil Election)

लुला दा सिल्व्हा हे २००३ ते २०१० पर्यंत ब्राझीलचे राष्ट्रपती होते. त्यांनी निवडणुकीदरम्यान देशात समृद्धी आणण्याचे आश्वासन दिले होते. लुला २०१८ ची निवडणूक लढवू शकले नाहीत. ७७ वर्षीय लुला दा सिल्व्हा यांना २०१८ मध्ये भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्यामुळे ते त्या वर्षी निवडणूक लढवू शकले नाही. त्यानंतर २०१९ मध्ये त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने खटला चालवला गेल्याच्या कारणावरून त्याची शिक्षा रद्द करण्यात आली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सहाव्यांदा राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली. १९८९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. (Brazil Election)

लूला सर्वेक्षणातही पुढे होते…

सर्वेक्षणात लुला हे जनतेच्या पसंतीचे उमेदवार होते, असे समोर आले होते. असे असूनही 2 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या पहिल्या फेरीत बोल्सोनारो यांनी ओपिनियन पोलला मागे टाकले, परंतु त्यांचा विजय कठीण मानला जात होता. पहिल्या फेरीत माजी राष्ट्रपती आणि डावे नेते लुला डिसिल्व्हा यांना ४८ टक्के आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना ४३ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीचा प्रचारादरम्यान, दोन्ही उमेदवार एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले. यात माजी राष्ट्रपती डिसिल्व्हा यांनी कोरोनादरम्यान झालेल्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. कोरोना महामारीमुळे ब्राझीलमध्ये 680,000 मृत्यू झाले, तर यापैकी निम्म्या लोकांना वाचवता आले असते. त्यांनी बोलसोनारो सरकारवर कोविड लसींच्या खरेदीत उशीर केल्याचा आणि अप्रमाणित उपचारांना पुढे आणल्याचा आरोप यावेळी आरोप केला. (Brazil Election)

आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर देत विद्यमान राष्ट्रपती बोल्सोनारो यांनीही लुला यांच्या विरोधात कठोर टिप्पणी केली. लुला यांच्या पक्षाने 14 वर्षे देशावर राज्य केले आणि या काळात या लोकांनी देशाला भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमध्ये ढकलले. परिस्थिती इतकी धोकादायक बनली आहे की लुला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांच्यासह त्यांच्या डझनभर समर्थकांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT