High profile prostitution  
Latest

पुणे : फलक ‘स्पा’चा अन् आत चालत होता वेश्या व्यवसाय; परदेशी तरुणींचा वापर

मोनिका क्षीरसागर

पुणे, पुढारी वृत्तसेवा : शहरातील उच्चभ्रू परिसरातील सोसायट्यांच्या प्लॅटस्मध्ये स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली काही ठिकाणी राजरोस वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे, पोलिसांनीच केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. एकीकडे शहरात फोफावत जाणार्‍या वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे. तरी, दुसरीकडे मात्र खात्यातील काही 'वसुलीबहाद्दरांच्या' अभयामुळे असे प्रकार थांबणार तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. बाणेर येथील कारवाईत एका झिरो पोलिसाला अटक करण्यात आली. त्यामुळे स्पा सेंटरच्या नावाखालील वेश्या व्यवसायातील 'अभयकारी' अर्थकारणापुढे आले आहे.

कोरोना संसर्गाच्या कालावधीत या व्यवसायाला काही काळ ब्रेक लागला होता. मात्र निर्बंध शिथील होताच पुन्हा स्पा सेंटरचा व्यवसाय उभारी घेऊ लागला आहे. अशातच आता हायप्रोफाईल परिसरात फ्लॅट भाड्याने घेऊन स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आकर्षक प्रलोभन, स्पा व मसाज सेंटरमध्ये विदेशी तरुणींचा सहभाग आणि मसाज सर्व्हिसच्या नावाखाली चालणारे भलतेच धंदे यामुळे अल्पवधीतच स्पा व मसाज सेंटरचा धंदा फोफावत गेला. मात्र सर्वच ठिकाणी असे गैरप्रकार चालतात असे नाही तर, नियमानुसार स्पा व मसाज सेंटर चालविणारे व्यवसायिक देखील आहेत.

उच्चभ्रू सोसायटीत थाटला जातोय धंदा

स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची माहिती पोलिसांना समजू नये, म्हणून दलालांकडून उच्चभ्रु परिसराची निवड केली जातेय. आयुर्वेदीक मसाज सेंटरच्या नावाने जाहिरात करून त्याला आकर्षक पद्धतीने तयार केले जाते आहे. अनेकदा त्याचा अंदाज त्या परिसरात राहत असलेल्या नागरिकांनादेखील येत नाही. सध्या सोसायटीमधील फ्लॅट भाड्याने घेऊन स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा गोरख धंदा थाटला जातो आहे.

जादा पैशांचे प्रलोभन..

जादा पैशाचे प्रलोभन दाखवून विदेशी तरूणींना जाळ्यात खेचले जाते आहे. स्पा व मसाज सेंटरमध्ये थायलंडच्या तरुणींचे प्रमाण मोठे आहे. पर्यटन व्हिसावर या तरुणी भारतात येतात. कमी कालावधीत जास्ती-जास्त पैसा कमविण्याचा हेतू या पाठीमागे असतो. नुकतेच औंध येथे केलेल्या कारवाईत चार विदेशी पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

झिरोचा मास्टर चौकशीच्या गर्तेत

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस दलातील दोन कर्मचारी झिरोचे मास्टर आहेत. त्यातील एक कर्मचारी ऑपरेटर म्हणून एका अधिकार्‍याकडे काम करतो. संबंधीत कर्मचारी झिरोच्या कारनाम्यामुळे चौकशीच्या गर्तेत आला आहे. गेल्या आठवड्यात बाणेर परिसरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी स्पा सेंटर चा मालक व त्याच्या साथीदाराला अटक केली. यावेळी एका झिरो देखील पकडले होते. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला तंबी भरत त्याने आपण गुन्हे शाखेचा पोलिस असल्याची बतावणी केली. हा झिरो दोन वसुली बहाद्दर कर्मचार्‍यासाठी काम करत असल्याचे समजते. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या व गैरप्रकार करणार्‍या स्पा सेंटरमधून तो महिन्याकाठी मोठी माया जमा करत असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT