कोलंबो/लंडन, पीटीआय : ब्ल्यू व्हेल या माशाच्या धोक्यातील प्रजातीच्या संवर्धनासाठी मालवाहू जहाजांचा सागरी मार्ग बदलण्याच्या (ट्रॅफिक सेपरेशन स्किम) आंतरराष्ट्रीय सागरी पर्यावरण संरक्षण समितीच्या (एमईपीसी) प्रस्तावाला श्रीलंका सरकारने चौथ्यांदा नकार दिला आहे. जहाजांशी धडकून या माशांच्या मृत्यूच्या अनेक घटना जगभरात घडत आल्या आहेत. ब्ल्यू व्हेलचे वैशिष्ट्य म्हणजे हा मासा स्थलांतर करत नाही. समुद्राच्या विशिष्ट परिघातच रहिवास करतो.
भारतासह चीन, इजिप्त आणि पाकिस्ताननेही या प्रस्तावाला नकार दिला आहे, हे येथे उल्लेखनीय! दुसरीकडे स्पेन, कॅनडा आदी देशांनी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ब्ल्यू व्हेल हे श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगाचे एक आकर्षण आहे, हे विशेष! ब्ल्यू व्हेलच्या संरक्षण, संवर्धनासाठी मात्र श्रीलंकेने चर्चेची तयारी दर्शविलेली आहे. सध्याचा जहाज मार्ग हा जगातील सर्वांत व्यग्र मार्ग आहे आणि या मार्गावर ब्ल्यू व्हेल्सना मोठ्या संख्येने अपघात झालेले आहेत. प्रस्तावित मार्ग हा सध्याच्या मार्गापासून केवळ 15 नॉटिकल मैल दूर आहे. नव्या मार्गामुळे ब्ल्यू व्हेलना होणारे 95 टक्के अपघात टळतील, असे समितीचे म्हणणे आहे.
श्रीलंका सरकारने समितीचा डाटा नाकारला आहे. व्हेल माशांच्या मृत्यूचे प्रकार हे श्रीलंकेलगतच्या समुद्रापेक्षा खूप लांबवर घडलेले आहेत, पण त्याचे खापर श्रीलंकेवर फोडले जात आहे, असे श्रीलंका नौदलातील वरिष्ठ अधिकारी उपुल पेईरिस यांनी सांगितले. जहाजांच्या धडकेने ब्ल्यू व्हेल मरण पावल्याच्या श्रीलंकेत नमूद करण्यात आलेल्या घटनांपैकी एकही आमच्या पाहण्यात, वाचण्यात, ऐकिवात नाही, असेही पेईरिस यांनी सांगितले. सध्याचा मार्ग हा आमच्या किनार्यासाठी जवळचा मार्ग आहे. प्रस्तावित मार्ग हा खर्चिक ठरेल असे, त्यांचे म्हणणे आहे.
सध्या परिस्थिती काय?
200 जहाजे ब्ल्यू व्हेलच्या अधिवासातून दररोज ये-जा करतात
पूर्वानुभव काय?
1988 ते 2012 दरम्यान कॅलिफॉर्निया सागरी राज्यमार्गाच्या किनारपट्टीवरील भागात जहाजे धडकल्याने 100 व्हेलचा मृत्यू. नंतर मार्ग एक नॉटिकल मैल पुढे सरकवल्याने व्हेल मृत्यूच्या घटना आटोक्यात
भविष्यासाठी शिफारस काय?
सध्याचा मार्गापासून 15 नॉटिकल मैल अंतरावर नवा मार्ग झाल्यास जहाजे ब्लू व्हेलवर धडकण्याचे प्रमाण 95 टक्क्यांनी कमी होईल.