Latest

रक्ताच्या ‘एआय’ चाचणीने होणार कर्करोगाचे निदान

Arun Patil

बीजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच 'एआय'चा वापर वैद्यकीय क्षेत्रातही होत असून, त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांसाठीची नवी दालनेही खुली होत आहेत. एका संशोधनातून असे दिसून आले की, आता रक्ताच्या एखाद्या वाळलेल्या थेंबाच्या नमुन्यातूनही कर्करोगाचे अचूक निदान केले जाऊ शकते. या संशोधनात करण्यात आलेल्या प्रारंभिक प्रयोगांमध्ये उपकरणांना कर्करोगाचे निदान करण्यासाठी केवळ काही मिनिटेच लागली. गॅस्ट्रिक, कोलोरेक्टर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये तसेच निरोगी लोकांमध्ये फरक करण्यातही ते सक्षम होते. संशोधकांनी म्हटले आहे की, रक्तातील काही रसायनांचा छडा लावून या चाचणीच्या माध्यमातून सुमारे 82 ते 100 टक्के प्रकरणांमध्ये कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते.

या नव्या उपकरणात मशिन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. ते रक्ताच्या नमुन्यातील मेटाबोलाईटस्च्या बायप्रॉडक्टचे विश्लेषण करते. मेटाबोलाईटस् रक्ताच्या तरल भागात आढळते, ज्याला सीरम म्हणून ओळखले जाते. हे मेटाबोलाईटस् बायोमार्करचे काम करतात. तेच शरीरातील संभाव्य कर्करोगाच्या अस्तित्वाचा छडा लावतात. चीनच्या वैज्ञानिकांनी या चाचणीची पद्धत विकसित केली आहे. त्याबाबतची माहिती 'नेचर सस्टेनिबिलिटी' मासिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोलोरेक्टल व गॅस्ट्रिक कॅन्सरसारखे कर्करोगाचे प्रकार गंभीर असूनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही ब्लड टेस्ट उपलब्ध नाही. त्यामुळे हे नवे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते. सध्या या कर्करोगांचे निदान करण्यासाठी इमेजिंग किंवा सर्जरी गरजेची ठरते. नव्या टेस्टमध्ये कर्करोगाचे निदान करण्यासाठी 0.05 मिलिलिटरपेक्षाही कमी रक्ताची आवश्यकता असते. अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनमधील डॉ. चुआन कुआंग यांनी सांगितले की, द्रवरूप रक्ताच्या तुलनेत कोरडे रक्त गोळा करणे, सुरक्षित ठेवणे आणि एका जागेवरून दुसरीकडे नेणे हे सोपे, स्वस्त ठरू शकते आणि सहज उपलब्ध उपकरणांनी ते करता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT