Latest

Black box : ऑस्ट्रेलियात बनणार पृथ्वीचा ‘ब्लॅक बॉक्स’!

Arun Patil

मेलबोर्न : विमानांच्या ब्लॅक बॉक्सची अनेकांना माहिती असेल. विमानांचा अपघात झाल्यानंतर त्याची कारणे शोधण्यासाठी अशा ब्लॅक बॉक्सचा उपयोग होत असतो. त्यामध्ये विमानाला असणार्‍या धोक्यांची नोंद होते. आता पृथ्वीचाही ब्लॅक बॉक्स (Black box) बनवला जात आहे. हा ब्लॅक बॉक्स हवामान बदल आणि अन्य मानवनिर्मित धोक्यांना रेकॉर्ड करून ठेवेल. तसेच मानवी संस्कृतीचे पतन घडत असेल तर तिची कहाणीही यामध्ये जतन केली जाईल.

हा ब्लॅक बॉक्स सुमारे 32 फूट लांबीचा असेल आणि तो कधीही न तुटू शकणार्‍या स्टीलपासून बनवला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या टास्मानियामध्ये तो बनवला जाणार आहे. हा स्टीलचा मजबूत ब्लॅक बॉक्स (Black box) हार्ड ड्राईव्हने भरला जाईल जो पृथ्वीच्या विनाशाबाबत 'कोणत्याही पक्षपाताशिवाय' संपूर्ण नोंद ठेवेल. हा ब्लॅक बॉक्स वातावरणातून तापमान, सागरी जलस्तर, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आणि अन्य आकडेवारींची नोंद घेईल.

या नोंदी दस्तावेजांप्रमाणेच असतील ज्यामधून समजून येईल की मानव हवामान बदलाच्या आपत्तीला रोखण्यास कसा अपयशी ठरला. हा विमानात लावल्या जाणार्‍या ब्लॅक बॉक्सप्रमाणेच असेल जो विमानांच्या स्थितीला रेकॉर्ड करतो आणि दुर्घटनेनंतर हवी ती माहिती पुरवतो. जर दुर्दैवाने पृथ्वीवरील जीवसृष्टीचा मोठा नाश झाला तर बचावलेल्या लोकांना या ब्लॅकबॉक्समधून तत्संबंधीची माहिती मिळू शकेल.

मात्र, या ब्लॅक बॉक्सचा वापर हे बचावलेले मानव कसे करतील याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. भीषण आपत्तीमधूनही मानवांचा छोटासा का होईना समूह वाचू शकेल जो अशा आपत्तींमधून धडा घेत मानव वंशाला पुढे चालवेल. सौरऊर्जेच्या सहाय्याने काम करणार्‍या या बॉक्सची किती किंमत असेल हे स्पष्ट झालेले नाही. त्याची निर्मिती 2022 च्या मध्यापासून सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT