पुणे; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणार्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या या भूमिकेबद्दल भाजपमधूनच नाराजीचा सूर उमटला आहे. पक्षाने सर्वकाही देऊन अशा पध्दतीने पक्षाची शिस्त मोडणे चुकीचे असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आणि कोथरूडचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी दिले आहे. चांदणी चौक उड्डाणपुलासाठी आपण पाठपुरावा केला असताना कोथरूडचे आधुनिक नेते त्याचे श्रेय घेतात, तसेच पक्षात मला डावलले जात असल्याचे सांगत माजी आमदार कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती.
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या ऐन पूर्वसंध्येला कुलकर्णी यांच्या 'नाराजी बॉम्ब'ने खळबळ उडाली होती. मात्र, आता भाजपमधून कुलकर्णी यांच्या अशा पध्दतीच्या वागण्यावरून टीका सुरू झाली आहे. कोथरूडचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या साध्या हँडबिलवर फोटो नाही, हा माजी आमदारांचा आक्षेप होता. पण, याच वेळी शहरात 240 होर्डिंगवर यांचे फोटो होते. वृत्तपत्रातील जाहिरातीत यांचे फोटो होते.
साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षाने आम्हाला दिलेली शिकवण आहे. पक्ष आधी, नंतर आपण, हे आपल्या पक्षाचे विचार आहेत. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही असे व्यक्त होणे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटले नाही. तर, प्रवक्ते आंबेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलकर्णी यांना उत्तर दिले आहे.
तुम्हाला नगरसेवक, आमदार म्हणून संधी देत असताना अनेक कार्यकर्त्यांना डावलले गेले, त्यांची तुम्ही चिंता केली होती का? तसेच तुम्हाला संधी दिलीच नसती तर ठीक होते. पुढील काळात परिस्थितीनुसार दुसर्या कोणाला संधी मिळाली असेल, तर तुमची टीका योग्य नाही. तसेच चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे श्रेय कोणा एका व्यक्तीचे नसून ते भाजपचे असल्याचे आंबेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा