बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघावरील पकड मजबूत करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर देण्याचे नियोजन भाजपकडून केले जात असल्याचे गेल्या काही महिन्यांतील घडामोडींवरून समोर आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दोन महिन्यांतच मतदारसंघात दुसरा दौरा होणार आहे.
या दौर्याच्या पूर्व तयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामती मुक्कामी येणार आहेत. ना. पटेल हे विशेषतः या दौर्यात सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. सहकारातील ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या सांगवीतील निवासस्थानी ते मुक्कामीही राहणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांत यापूर्वी दौरा केला. त्यांच्या दौर्यामुळे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बुस्ट मिळाला होता. मी बारामतीला वारंवार येणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले होते. त्यांचा लवकरच दौरा होणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी प्रल्हादसिंह पटेल बारामती दौर्यावर येत आहेत.
याबाबत भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी माहिती दिली. मोटे म्हणाले, की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोव्हेंबरच्या अखेरचा आठवडा किंवा डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दुसरा दौरा आयोजित केला आहे. त्याची पूर्वतयारी आतापासूनच सुुरू केली आहे.
पटेल हे बारामतीत 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी मुक्कामी दौऱ्यावर येणार आहेत. 11 तारखेला खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीवरून पटेल हे बारामती येथे येणार आहेत. या वेळी पटेल यांच्या समवेत आमदार व बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदे, गणेश भेगडे, वासुदेव काळे आदी उपस्थित राहणार आहेत.
सहकारातील दिग्गजांच्या घेणार भेटी
पटेल हे बारामती, इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीचे विरोधात असलेल्या शेतकरी संघटना, समित्यांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे यांच्या सांगवी येथील निवासस्थानी मुक्काम करणार आहेत.
ते राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सतीश काकडे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर पटेल हे 12 नोव्हेंबर रोजी इंदापूर, भिगवण, दौंड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर कौन्सिल हॉल पुणे येथे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.