मुंबई : नरेश कदम: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दलित वोट बँक जमा करण्याची रणनीती भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखली आहे. यासाठी कवाडे गटासोबतच प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य गटांना आपल्याकडे आणण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. ( BJP strategy )
भाजपकडे ओबीसीची वोट बँक आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत ओबीसीची वोट बँक काही प्रमाणात दुरावली होती. मात्र गेल्या तीन वर्षांत भाजपने ओबीसीची वोट बँक पुन्हा आपल्याकडे वळवली आहे. पण भाजपच्या समोर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्षांची महाआघाडी एकत्र भाजपविरोधात लढणार आहे. विशेष म्हणजे मुस्लिम मतदारही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या बाजूने आकर्षित होत आहे. हे भाजपसाठी आणखी धोक्याचे आहे. त्यामुळे ओबीसी आणि दलित अशी वोट बँक उभी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.आरपीआयचा रामदास आठवले गट भाजपसोबत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आणि कवाडे यांचा गट भाजपसोबत थेट जाणार नाही.त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत कवाडे यांनी युती केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मराठा आमदार आले असले तरी शिंदे हे राज्यातील मराठा मतांवर किती प्रभाव टाकतील, याबद्दल भाजपला शंका आहे. तसेच ओबीसी आणि मराठा अशी मोट बांधता येणार नाही. २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण देऊन भाजपला तितकी मराठा मते मिळाली नाहीत. तसेच ओबीसी मतदार भाजपपासून दुरावला होता. आता ओबीसी, दलित अशी वोट बँक केली तर आघाडीला टक्कर देता येईल, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. कारण शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकर गेले तरी भाजपसाठी अडचणीचे ठरू शकते.
शरद पवार यांनी एकदा लोकसभा निवडणुकीत आरपीआयच्या सर्व गटांना सोबत घेऊन यश मिळविले होते. शिवसेना फोडली असली तरी याचा भाजपला निवडणुकीत किती फायदा होईल, याची लिटमस टेस्ट झालेली नाही. तसेच शिंदे यांच्या ४० आमदारांचा उद्धव यांच्या शिवसेनेशी टक्कर देताना घाम निघणार आहे.