मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम असून, सातारा, माढा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांचे जागावाटप अद्यापही रखडले आहे. महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या 'मनसे'ला कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावरूनही घोडे अडले आहे. यावर अंतिम निर्णय दिल्लीतच होईल, असे शुक्रवारी स्पष्ट झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशाने पेच आणखी वाढला आहे. 'मनसे'ने महायुतीत किमान दोन जागांची मागणी केली आहे. 'मनसे'ला कोणत्या आणि कोणाच्या कोट्यातील जागा द्यायच्या, यावर खल सुरू आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जातील आणि जागावाटपावर अंतिम तोडगा निघेल, अशी शक्यता होती. मात्र, त्यांचा दौरा लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचे जागावाटप हे धुळवडीनंतर दिल्लीत अंतिम होण्याची शक्यता आहे.
महायुतीने नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. मात्र, महाविकास आघाडीनेही राज्यात आव्हान उभे केल्याने हे टार्गेट गाठणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनाही सोबत घेण्याची खेळी भाजपने केली आहे. 'मनसे'चा फायदा मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे आदी जिल्ह्यांत महायुतीला करून घेण्याची भाजपची खेळी आहे. शिवाय, राज ठाकरे यांच्या रूपाने एक स्टार प्रचारक महायुतीला मिळणार आहे. राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डीपैकी दोन जागांची मागणी केली आहे; पण राज ठाकरेंना एक जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, अंतिम तोडगा निघालेला नाही.
राज ठाकरेंनाच निवडणूक लढविण्याचा मन सैनिकांचा आग्रह
'मनसे' नाशिकच्या पदाधिकार्यांनी नाशिकमधून स्वतः राज ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे; तर दक्षिण मुंबई किंवा शिर्डीतून बाळा नांदगावकर यांचे नाव चर्चेत आहे. नाशिकमधून राष्ट्रवादीकडून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हेदेखील लोकसभा निवडणूक लढवून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा पेच कायम आहे. नाशिकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा निवडणूक लढण्यास सज्ज आहेत. मुख्यमंत्री शिंदे हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत.
रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपचा दावा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास कंबर कसली आहे; पण भाजपने अजून या जागेवरचा दावा कायम ठेवला आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेबरोबरच भाजपनेही दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे, तर भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघावरही दिल्लीत अंतिम तोडगा काढला जाणार आहे.
उदयनराजेंचा दिल्लीत तळ
सातारा आणि माढा मतदारसंघांचा तिढा अजून संपलेला नाही. गेले दोन दिवस खासदार उदयनराजे भोसले हे भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र, त्यांची भेट झालेली नाही. ते सातार्यातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत, तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला माढ्यातून विरोध होत असल्याने ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे; पण सातारा आणि माढा मतदारसंघांच्या अदलाबदलीवर दिल्लीत अंतिम निर्णय होणार आहे.