कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. माजी मंत्री, आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांतच सोमय्या कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या दौर्याला कोणीही विरोध करणार नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे कार्यकर्ते संतप्त आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आ. मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी 8 सप्टेंबर 2021 रोजी ईडीकडे तक्रार दिली होती. यानंतर त्यांनी 28 सप्टेंबर 2021 रोजी मुरगूड पोलिस ठाण्यात आ. मुश्रीफ यांनी घोरपडे साखर कारखान्यासह गडहिंग्लजच्या अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना तसेच बेनामी कंपन्याच्या माध्यमातून 177 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार दिली होती.
आ. मुश्रीफ यांच्या कागल, कोल्हापूर आणि पुणे येथील घरांवर बुधवारी ईडीने छापेमारी केली. या छाप्यानंतर ईडीच्या हाती काय लागले हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, कारवाईनंतर कोल्हापुरात आलेल्या मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौर्याबाबत प्रतिक्रिया देताना, त्यांच्या दौर्याला कोणाचाही विरोध असणार नाही. आमचा कोणताही कार्यकर्ता त्यांना विरोध करणार नाही, असे स्पष्ट केले होते. ते जर कोल्हापुरात येणार असतील तर त्यांनी यावे. अंबाबाईचे दर्शन घ्यावे आणि आमच्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचाही आढावा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या उद्याच्या दौर्याबाबत तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनीही आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.