Nana Patole 
Latest

शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्र -राज्यातील भाजप सरकार बदलणार – नाना पटोले

स्वालिया न. शिकलगार

मुंबई/अकोला : पुढारी वृत्तसेवा – भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्रातील व राज्यातील सरकार बदलणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले अकोला दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे पण सरकार फक्त वीमा कंपन्या व कारखानदारांचे हित पाहत आहे, केवळ खोटे बोलणे आणि जुमलेबाजी करणे एवढेच काम भाजपने केले आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, सप्टेंबर महिन्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. पण सरकार दुकाष्ळ जाहीर करत नाही.

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल आणि हिवाळी अधिवेशनातही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील. भाजप खोटे बोलून सत्तेत आला आणि जनतेला दिलेली सर्व आश्वासने विसरला. भाजप हा जुमेलबाजी करणार पक्ष आहे. परंतु आता जनता या जुमलेबाज भाजप सरकारला कंटाळली आहे. या देशातील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष काँग्रेसच आहे. राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये असलेले काँग्रेस सरकार शेतकरी, तरुणवर्ग, महिला व गरिबांच्या हिताचे सरकार आहे. या राज्यातील सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. भाजप सरकारने १० वर्ष सत्ता भोगली. पण केवळ मित्रांचा विकास केला. आता त्यांचे काऊंटडाऊन सुरु झाले असून राज्यात व केंद्रातही बदल होऊन जनतेच्याहिताचे रक्षण करणारे सरकार येईल.

महाराष्ट्राला आज उडता पंजाब करण्याचे पाप भाजप सरकार करत आहे. नाशिकसह राज्यातील इतर भागातही ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ड्रग माफिया ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या.

राज्यात आज आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालेला आहे. आजच्या या परिस्थितीला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. भाजपाने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आणि राज्यात व केंद्रात सरकार आले तरी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला नाही. काँग्रेस आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते, त्यासाठी नारायण राणे समितीही नेमली होती. पण नंतर आलेल्या भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच राज्यात आजची परिस्थिती उद्भवली आहे. मोदी सरकारने २०१८ मध्ये घटनादुरुस्ती करुन राज्याचे आरक्षणाचे अधिकार काढून घेतले. पण देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अधिकार नसताना विधानसभेत आरक्षणाचा कायदा केला व समाजाची फसवून केली. आज आरक्षणाचा प्रश्न जो चिघळला आहे त्याला भाजपच जबाबदार आहे, असेही पटोले म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT