"केंद्रीय तपास यंत्रणाकडून सूडाचे राजकारण सुरू आहे. त्यातून संबंधित राजकीय व्यक्तींचं मोठं नुकसान होत आहे. ते नुकसान कोण भरून काढणार? विरोधकांना तंबाखू आणि गांजा यातील फरक कळत नाही. वीर सावरकरांची भाजपकडूनच बदनामी सुरू आहे", असं टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, "आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही. कुणी अंगावर आला तर सोडत नाही. शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा आल्यामुळे विरोधी पक्षाकडून वातावरण निर्मिती सुरू आहे. पण, सगळ्या देशाचं मेळाव्याकडे लागले आहे. सव्याज परतफेड करण्यासाठी हा मेळावा आहे. देशाला नवी दिशा देण्यासाठी उद्याचा दसरा मेळावा आहे."
केंद्रीय तपास यंत्रणांचा वाढता वापर यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "याला राजकारण म्हणत नाहीत, याला सूडाचं महाभारत म्हणतो. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून राजकीय लोकांवर दहशत बसवून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर चूक आहे. केंद्रामध्ये आमची सत्ता येईल, त्यावेळी हे सगळं मोडून काढलं जाईल. २०२४ ला संपूर्ण राजकारण बदलेल. तोपर्यंत भाजपने जे काय करायचं ते करू घ्यावं. येत्या काळात केंद्रामध्ये सर्वोच्च स्थानी शिवसेना असेल", असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.