JDCC Election : जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार  
Latest

JDCC Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार

रणजित गायकवाड

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : JDCC Election : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . भाजप पक्षाचे सर्व 18 उमेदवारांनी माघार घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आ महाजन म्हणाले की सर्व ठरले असताना यांनी यु टर्न घेतला आमच्या खासदार, आमदार याचे अर्ज बाद केले त्यामुळे भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे म्हणून निवडणुकीतुन माघार घेतली आहे. यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना आ. गिरीश महाजन म्हणाले की, जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून देण्याची परंपरा होती. त्याप्रमाणे यावर्षी प्रयत्न केला. आताच्या निवडणुकीसाठीही अशाच प्रयत्नांमध्ये भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होता. जागावाटपापर्यंत सर्व चर्चा झाली होती. नावे सुद्धा ठरली होती. मात्र, ऐनवेळी भाजपचा अन्य पक्षांनी विश्वासघात केला आणि निवडणुकीला भाग पाडले गेले. आमची पहिल्या दिवसापासून सहकार्याचीच भूमिका होती. मात्र, आम्हाला गाफील ठेऊन बाकीच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या. खरे तर हे विश्वासघाती आणि सत्तेच्या लालसेचे राजकारण होते, असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे, असे म्हणणारे सत्तेसाठीच असे बदलले. जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था, उद्योग आहेत. त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे. ही सगळी त्यांची सुरुवातीपासून स्वतःच्या विकासाची खेळी आहे. शेतकऱ्यांना नुसते 'बनवले' गेले आहे. त्यासाठीच या निवडणुकीतसुद्धा त्यांना जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम हवे होते. जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणाऱ्यांनी जिल्हा बँकेकडून किती शेतकऱ्यांचा व अन्य उद्योगांचा विकास आतापर्यंत केला?, या प्रश्नाचे उत्तर त्यांना जनतेपुढे द्यावेच लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT