Latest

अमेरिकेत बर्ड फ्लूचे थैमान; जगालाही धोका?

Arun Patil

वॉशिंग्टन : जग आता कुठे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असताना अमेरिकेत बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. तिथे केवळ कोंबड्यांनाच नव्हे, तर गायी, मांजरं आणि माणसांनाही त्याची लागण होत आहे. पिट्सबर्गमध्ये बर्ड फ्लूवर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांनी या आजाराचा मोठा धोका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काळात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. बर्ड फ्लूचा विषाणू 'एच 5 एन 1' अतिशय वेगाने पसरत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. त्यामुळे पक्ष्यांसह आता प्राण्यांनाही संसर्ग होत आहे. जर हा विषाणू असाच वाढत राहिला, तर भविष्यात तो कोरोनापेक्षाही भयंकर साथीचं रूप घेऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लू आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. पूर्वी हा रोग फक्त कोंबड्यांमध्येच होता; पण आता गायी, मांजर आणि माणसांनाही याची लागण होत आहे. अमेरिकेत कोंबड्यांमध्ये आणि 3,37,000 पिल्लांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. यात कोंबड्यांचा मृत्यूही झाला आहे. अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे गायींचाही मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अमेरिकेत डेअरी फार्ममध्ये काम करणारा एक व्यक्ती 'एच 5 एन 1' व्हायरसने पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळेच वैज्ञानिकांनी यावर संशोधन
सुरू केलं आहे. यात बर्ड फ्लूच्या विषाणूमध्ये अनेक प्रकारचं म्युटेशन होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनापेक्षा बर्ड फ्लूचा धोका अधिक असणार का? आणि यामुळे भारतात नवीन साथीचं रूप घेणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बर्ड फ्लूविषयी…

बर्ड फ्लू 'एच 5 एन 1' इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होतो. हा विषाणू पक्ष्यांमध्ये पसरतो आणि त्यांच्या श्वसनमार्गावर हल्ला करतो. त्यामुळे पक्ष्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. हा विषाणू पक्ष्यांची विष्ठा आणि लाळेद्वारे पसरतो. याचा संसर्ग दर इतका जास्त आहे की, काही दिवसांतच हा विषाणू लाखो पक्ष्यांना संक्रमित करू शकतो. बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांनाही होऊ शकतो. ज्या व्यक्ती पक्ष्यांच्या सान्निध्यात राहतात किंवा पोल्ट्री फार्ममध्ये काम करतात त्यांना या आजाराची लागण होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. पक्ष्यांची विष्ठा आणि संक्रमित पृष्ठभाग यांच्या संपर्कातून बर्ड फ्लू मनुष्यात पसरू शकतो. याचा संसर्ग झाल्यास खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होतो. वेळेवर उपचार न घेतल्यास मृत्यू ओढावू शकतो.

माणसासाठी किती धोकादायक?

कोरोनापेक्षा बर्ड फ्लू जास्त धोकादायक आहे. यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कोरोनाच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे; पण बर्ड फ्लूमध्ये मानवी संसर्ग कमी आहे. याचा अर्थ असा की, हा विषाणू पक्ष्यापासून माणसात पसरला, तरी तो एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये सहज पसरत नाही, तर कोरोनाचा संसर्ग फार लवकर होतो. एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली असली, तरी तो दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरण्याची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत बर्ड फ्लू हा कोरोनापेक्षा मोठी महामारी बनण्याचा धोका कमी आहे. डोकेदुखी, उलटी, ताप, श्वास घेण्यास त्रास ही बर्ड फ्लूची लक्षणं आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT