Latest

अर्थज्ञान : ‘विमा सुगम’ने काय साधणार?

Arun Patil

देशभरातील सर्व प्रकारच्या विमा खरेदी करणार्‍यांसाठी लवकरच विमा सुगम योजना लागू केली जाणार आहे. या योजनेची तयारी पूर्ण झाली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. ही सुविधा लागू झाल्यानंतर विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीला विमा खरेदी करणे, पॉलिसीचे नूतनीकरण करणे आणि दावा यांसारख्या प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येतील.

विमाधारकांच्या सुविधांसाठी एक नवीन तंत्रज्ञानाचे प्लॅटफॉर्म 'विमा सुगम' लागू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे आणि ती लवकरच दाखल होत आहे. विमा सुगम प्लॅटफॉर्मवरून सर्व प्रकारचे विमा जसे वाहन विमा, घराचा विमा, आरोग्य विमा, जीवन विमा यांसह अन्य योजना विमा कंपन्यांकडून खरेदी करणे सोयीचे जाणार आहे. विमा सुगमसाठी विमा नियामक संस्था 'इर्डा'ने गेल्या आर्थिक वर्षात त्यास मंजुरी दिली होती.

विमा सुगमचे फायदे : विमा सुगमच्या माध्यमातून कंपन्यांच्या विविध योजनांचा, सुविधांचा तुलनात्मक अभ्यास करण्यास मदत मिळेल. याप्रमाणे हप्त्याचे आकलन करणे, विमा खरेदी करणे, पॉलिसीत सुधारणा करणे, दावा निकाली काढणे यांसारख्या गोष्टींसाठी सिंगल विंडो सिस्टीम उपलब्ध होईल. विमा सुगम कार्यान्वित करण्यासाठी दोन टप्पे निश्चित केले आहेत. पहिल्या टप्प्यात हा प्लॅटफॉर्म विमा कंपनी आणि त्यांच्या मध्यस्थांसाठी एक महत्त्वाचा डेटा बँकप्रमाणे काम करेल. त्याचवेळी दुसर्‍या टप्प्यात विमा सुगम हे विमा कंपन्यांना आपल्या पॉलिसीला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. विमा सुगम प्लॅटफॉर्म हे प्रत्यक्षात येत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांत पारदर्शकता आणि विश्वासर्हता वाढेल. त्यामुळे ग्राहकांना सहजपणे चांगल्या विमा योजनेची निवड करता येईल. याशिवाय पॉलिसीचे नूतनीकरण आणि क्लेम आदी कामेदेखील सुलभतेने पार पाडले जाईल.

डिजिटल मोडमध्ये विमा पॉलिसी : विमा सुगम आल्यानंतर सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी डिजिटल मोडवर उपलब्ध होतील आणि ही पॉलिसी ऑनलाइनवर सुरू केलेल्या डिमॅट खात्यात सुरक्षितपणे ठेवली जाईल. त्यामुळे विमाधारकांच्या सर्व प्रकारच्या पॉलिसी आणि केवायसीशी संबंधित कागदपत्रे डिजिटल मोडवर सुरक्षित राहतील. त्याचा वापर सहजपणे करता येऊ शकतो. या सुविधेमुळे पॉॅलिसीचे नूतनीकरण करताना कागदपत्रांची गरज भासणार नाही. कागद आणि वेळ याची बचत हेाण्याबरोबरच खर्च कमी करण्यासाठी देखील उपयुक्त राहील.

विमा सुगममध्ये कमी हप्ता : विमा सुगम प्लॅटफॉर्म हा सामान्यपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना सहजपणे व सुलभतेने पॉलिसीसंबंधी माहिती मिळेल. त्यामुळे एजंट आणि ब—ोकरऐवजी थेट विमा कंपनी आणि अधिकारी यांच्यात माहितीचे आदानप्रदान केले जाईल. पॉलिसीची विक्री थेट कंपनीकडून होत असल्याने कमिशनची बचत होईल आणि त्याचा लाभ स्वाभाविकपणे ग्राहकांना मिळेल. परिणामी हप्ता देखील कमी राहू शकतो.

विमा सुगम कशासाठी आवश्यक? : एका अंदाजानुसार सध्याच्या काळात जीवन विमा पॉलिसी खरेदी करणारे नागरिक आणि संभाव्य खरेदी करणार्‍यांची संख्या यात 83 टक्क्यांचा फरक आहे. हा मोठा आकडा असून, अजूनही मोठी लोकसंख्या विमा योजनांपासून दूर आहे. याप्रमाणे 50 टक्केच वाहनांचा विमा उतरविण्यात आला आहे. अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात आरोग्य विमा, गृह विमा, मालमत्ता विम्याची आहे.

विमा सुगममध्ये नवीन तरतूद : भारतात विमा नियामक संस्था 'इर्डा'ने सर्व विमा पॉलिसीला डिजिटल मोडमध्ये जारी करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यास डी-मटेरियलाजेशनची प्रक्रिया असे म्हणतो. त्याचा उद्देश पॉलिसी खरेदी करणे, नूतनीकरण करणे, दावा निकाली काढणे आदी प्रक्रिया सुलभ आणि सहज करण्याचा आहे. या सर्व गोष्टी डिजिटल मोडमध्ये सुलभ, सहज आणि सुस्थितीत ठेवता येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक प्रपोजल फॉर्म : विमा कंपनी आणि विमा सल्लागार किंवा ब्राेकर किंवा विमा अग्रीगेटर हे ग्राहकाकडून अर्ज भरून घेतात आणि पॉलिसी सक्रिय करण्याची प्रक्रिया करतात. परंतु आता विमा सुगम लागू झाल्यानंतर एकतर डिजिटल स्वाक्षरी किंवा आधार कार्डच्या ओटीपीच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली जाईल. विमाधारकारकास पॉलिसी हरवणे किंवा विसरणे, खराब होणे, भिजणे यांसारख्या अडचणींतून दिलासा मिळेल कारण पॉलिसीला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षित ठेवले जाईल.

* विमा सुगम प्लॅटफॉर्मवरून वाहन विमा, घराचा विमा, आरोग्य विमा, जीवन विमा यांसह अन्य योजना विमा कंपन्यांकडून खरेदी करणे सोयीचे होणार.

* सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी डिजिटल मोडवर उपलब्ध. सर्व प्रकारच्या पॉलिसी आणि केवायसीशी संबंधित कागदपत्रे डिजिटल मोडवर सुरक्षित.

* एजंट आणि ब्राेकरऐवजी थेट विमा कंपनी आणि अधिकारी यांच्यात माहितीचे आदानप्रदान केले जाईल. पॉलिसीची विक्री थेट कंपनीकडून.

* डी-मटेरियलाजेशनच्या प्रक्रियेमुळे पॉलिसी खरेदी करणे, नूतनीकरण करणे, दावा निकाली काढणे आदी प्रक्रिया सुलभ.

* विमा सुगम लागू झाल्यानंतर एकतर डिजिटल स्वाक्षरी किंवा आधार कार्डच्या ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी होणारी. त्यामुळे पॉलिसी हरवणे किंवा विसरणे, खराब होणे, भिजणे यांसारख्या अडचणींतून दिलासा मिळणार.

अपर्णा देवकर 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT