पुढारी ऑनलाइन डेस्क : Bihar Terror Module एनआयएने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 32 ठिकाणी छापे टाकले, अररिया ते दरभंगापर्यंत अटक सत्र सुरूच पाटणा टेरर मॉड्युल संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज बिहारमधील 32 ठिकाणी छापे टाकले. पहाटे एनआयएचे पथक प्रथम अररियातील जोकीहाट येथे पोहोचले जेथे त्यांनी एहसान परवेझच्या घरावर छापा टाकला आणि झडती घेतली. त्याचवेळी पथक दरभंगा येथे पोहोचले आणि त्यांनी नुरुद्दीन जंगीच्या घराजवळ छापा टाकला.
पाटणा टेरर मॉड्युल प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी फुलवारी शरीफ येथून अतहर परवेज आणि मोहम्मद जलालुद्दीन यांना अटक केली होती. यानंतर मरगुब दानिश, अरमान मलिक आणि शब्बीर आलम यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये झारखंडमधील निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद जल्लाउद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)चा माजी सदस्य अतहर परवेझ यांचा समावेश आहे. एएसपी फुलवारी शरीफ मनीष कुमार यांनी माहिती दिली की एकूण २६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पाटणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी पाटणा येथील फुलवारी शरीफ येथील अहमद पॅलेसच्या दुसऱ्या मजल्यावर प्रशिक्षण केंद्र बनवले होते. बिहारमध्ये अनेक ठिकाणी पसरलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाशीही ते संबंधित होते. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी मार्शल आर्टच्या नावाखाली दहशतीचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्याकडून PFI-SDPI चे 'मिशन 2047' हे गुप्त दस्तऐवज सापडले आहे, ज्यामध्ये 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे म्हटले आहे.
एनआयएचा दुसरा अहवाल मुनीर कॉलनीत राहणाऱ्या मरगुब अहमद दानिश उर्फ ताहिर याच्या अटकेवर आधारित आहे. एफआयआरनुसार ताहीरवर "भारतविरोधी कारवायांमध्ये आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रभावशाली तरुणांचे कट्टरपंथीकरण" यामध्ये कथितपणे सहभाग होता.
मारगुब अहमद दानिशच्या चौकशीदरम्यान, एफआयआरमध्ये म्हटले आहे की, तो "गझवा-ए-हिंद" नावाच्या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपचा आणि "गझवा-ए-हिंद" नावाच्या बीआयपी चॅटवरील ग्रुपचा अॅडमिन असल्याचे उघड झाले आहे. आणि तो, भारतातील प्रभावशाली तरुणांच्या कट्टरपंथीकरणात सामील आहे.