पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठा घोटाळा झाला असून ईडीची कारवाई नियमानुसार असल्याचे भाजप नेते व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज (दि.१३) ईडीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, राहुल यांच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांची ईडीकडून सव्वा तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, मला वाटते एजीएल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी संपत्ती करत असेल तर यावर कारवाई होणे स्वाभाविक आहे. मला वाटते काँग्रेसने विनाकारन हंगामा करून या प्रकरणाचा बाऊ केला. काँग्रेसने चूकीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस लोकशाही नाही तर राहुल गांधींची दोन हजार कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी आंदोलन करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावल्यानंतर राहुल गांधी आज सक्तवसुली संचलनालय कार्यालयात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात असताना स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी आंदोलन केलं जात असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी यावेळी केला. बेकायदेशीरपणे कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी राजकीय कुटुंबाने यापूर्वी कधीही तपास यंत्रणांना रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता असंही यावेळी त्यांनी म्हटलं.