Latest

‘बिद्री’त सात साखर सम्राटांची प्रतिष्ठा पणाला!

Arun Patil

गुडाळ : बिद्री साखर कारखान्याच्या हायव्होल्टेज निवडणुकीमुळे मातब्बर नेत्यांबरोबरच प्रचारात उतरलेल्या सात साखरसम्राटांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. या निवडणुकीत दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन राष्ट्रीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, 'गोकुळ'सारख्या शिखर संस्थेचे चेअरमन एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे.

बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे खरं तर विद्यमान चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांचे एकेकाळचे शिष्य आ. प्रकाशराव आबिटकर यांच्या राजकीय संघर्षातील आणखी एक निवडणूक! मात्र या निवडणुकीला अनेक कंगोरे असल्याने जिल्ह्यातील नेतेमंडळी यात ओढली गेली आणि निवडणूक हायव्होल्टेज झाली.

ना. हसन मुश्रीफ आणि ना. चंद्रकांत पाटील हे सरकारमधील दोन वजनदार मंत्री, खा. संजय मंडलिक आणि खा. धनंजय महाडिक हे दोन खासदार, आ. सतेज पाटील आणि आ. प्रकाशराव आबिटकर हे दोन आमदार, दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, के. पी. पाटील, संजय घाटगे, अमल महाडिक हे पाच माजी आमदार, 'गोकुळ'चे चेअरमन अरुण डोंगळे, ए. वाय. पाटील आणि राहुल देसाई हे दोन जिल्हाध्यक्ष या सर्वपक्षीय मातब्बरांची प्रतिष्ठा 'बिद्री'मध्ये पणाला लागली आहे.

डॉ. डी. वाय. पाटील, सेनापती घोरपडे, मंडलिक, भीमा, छ. शाहू, छ. राजाराम आणि बिद्री असे तब्बल सात साखरसम्राट या कारखाना निवडणुकीच्या प्रचारात उतरले असून यावरून या निवडणुकीचे महत्त्व समजून येते. मंगळवारी (दि. 5 डिसेंबर) कोल्हापुरात मुस्कान लॉनवर 'बिद्री'ची मतमोजणी होणार असून निकालानंतर कोणाच्या चेहर्‍यावर मुस्कान दिसणार याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT