Latest

भास्कर जाधव म्हणाले, “नितेश राणेंना कायमचं निलंबित करा”

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जेव्हा विधीमंडळाच्या सभागृहातच प्रवेश करत होते, तेव्हा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी 'म्याऊ म्याऊ' आवाज काढून डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर आज सभागृहात आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट नितेश राणेंना कायमचं निलंबित करावं, अशी मागणी सभागृहापुढे केली.

भास्कर जाधव चांगलेच आक्रमक 

नितेश राणेंच्या कृत्यावर आक्षेप घेत भास्कर जाधव म्हणाले की, "या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफीदेखील मागितली. पण आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधांनी आवाज काढले", असे मत भास्कर जाधव हे संतप्त होऊन मांडले.

"आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू नये असं त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते. तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते. चंद्रकांत पाटलांची घोषणा होती 'आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू.' तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा", अशी  मागणी भास्कर जाधव यांनी केली.

ही लोकशाहीची हत्या होईल ः फडणवीस

"सभागृहात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पहायचंच नाही असा नवा पायंडा सुरु झाला आहे का? ठरवून निलंबन केलं जात अल्याचं दिसत आहे. आम्हाला हरकत नाही, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असं वागू नये सांगितलं आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला आहे म्हणून निदर्शनास आणू देतो की, याच सभागृहात भुजबळ साहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचे तेव्हा हुप हुप करणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवही होते. हे या सभागृहाने पाहिलं आहे", अशी प्रतिटीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

"भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की, नितेश राणे बाहेर बोलले. ते चुकीचं बोलले ही मी जाहीर भूमिका घेतली आहे. माझा सदस्य असला तरी ही भूमिका घेण्याची हिंमत आमच्यात आहे. पण अध्यक्ष महोदय तुमचा डाव येथे लक्षात येत आहे. तुम्हाला आणखी एक सदस्य निलंबित करायचा आहे. सरकार बदलत असतं, एकदा पायडा पाडला तर त्यानंतर येणारं सरकार कोणत्याच विरोधकांना ठेवणार नाही आणि लोकशाहीची हत्या होईल", असंही त्यांनी सांगितलं.

पहा व्हिडीओ : "दिल ये जिद्दी है", म्हणत ऐश्वर्याची विजयी घोडदौड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT