Latest

भास्कर जाधव म्हणाले, “किरीट सोमय्यांनी स्वतःवरील दगड हल्ला घडवून आणला”

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : हनुमान चालिसा आणि घोटाळे हे मुद्दे उपस्थित करत भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि अपक्ष राणा दाम्पत्य यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात राज्यात मोहिमच उघडली आहे. त्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव म्हणाले की, "कोण हा रवी राणा, बाळासाहेबांनी तुझ्यासारखा फडतूस माणसाला शिवसैनिक कधीच करून घेतला नसता. हनुमान चालिसा वाचून जर बिघडलेली संपूर्ण परिस्थिती सुधारणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा वाच", अशी टीका जाधव यांनी रवी राणा यांच्यावर केली आहे.

किरीट सोमय्यांनी स्वतः दगड हल्ला घडवून आणला? 

"किरीट सोमय्यांवर दगड हल्ला झाला की त्यांनी तो स्वत: घडवून आणला? हा पहिल्यांदा संशोधनाचा भाग आहे. रात्री साडेनऊ वाजता तिथे जाण्याचं किरीट सोमय्यांच काय काम होतं? ते कशासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते? एखाद्या आरोपीला अटक झाली, तर नियामनुसार त्याचे वकील किंवा त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनला जाऊ शकतात. रवी राणा हे किरीट सोमय्यांचे कोण आहेत? त्यांचं काय नातं आहे? हे एकदा महाराष्ट्राला कळालं पाहिजे."

"जाणीवपूर्वक परिस्थिती बिघडवण्यासाठी स्वत:हूनच एखादा कट रचून, स्टंटबाजी करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं, ही किरीट सोमय्यांची जुनी खोड आहे. म्हणून मला असं वाटतं की या मागे कुठलाही पक्ष नाही, शिवसेना नाही, महाविकास आघाडी नाही, तर स्वत: किरीट सोमय्यांनी रचलेला हा प्लॅन असावा आणि त्यांना अपेक्षित असलेली गाडीची काच फोडून त्यांनी स्टंटबाजी केलेली असावी, यापेक्षा दुसरा त्याला काही अर्थ नाही. परंतु पहिल्यांदा किरीट सोमय्या तिथे जाणीवपूर्वक का गेले होते? पंतप्रधान महाराष्ट्रात येत असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम किरीट सोमय्यांनी केलं आहे, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे", अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

रवी राणा तू शिवसेनेची काळजी करू नकोस

"कोण हा रवी राणा, बाळासाहेबांनी तुझ्यासारखा फडतूस माणसाला शिवसैनिक कधीच करून घेतला नसता. हनुमान चालिसा वाचून जर बिघडलेली संपूर्ण परिस्थिती सुधारणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाच. म्हणजे लोकांना पंतप्रधानांनी कबूल केल्याप्रमाणे १५-१५ लाख रुपये मिळतील. पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. नोटांबंदीमुळे रांगेत उभा राहून मृत्यू झालेल्यांना न्याय मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तू भाजपाचा समर्थक आहे, शिवसेनेची काळजी तू कशाला करतोस?", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

देशासमोर प्रश्नांवर भाजपा का बोलत नाही? 

भाजपावर टीका करताना जाधव म्हणाले की, "भाजपा आरोप-प्रत्यारोपांशिवाय दुसरं करतयं काय? भाजपाच्या हातात जे सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून या देशात चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करणं, महागाई कमी करणं, डिझेल-पेट्रोलचे दर कमी करणे, तरुणांच्या हाताला काम देणं, नवनवीन उद्योग निर्माण करणं, आज देशाच्या जवळील राष्ट्र हे आपल्यापासून दूर गेलेली आहेत. जी लांबची राष्ट्र आहेत त्यांना आम्ही जवळ करतोय आणि देशाच्या सीमेच्या लगतची राष्ट्र ही आपल्यापासून दूर गेलेली आहेत. आज श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती काय बोलते? आज चर्चा अशी आहे की श्रीलंकेची जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती आजच्या भाजपच्या सरकारच्या नेतृत्वाखाली काही वर्षानंतर या देशाची होणार नाही. यावर का भाजपा बोलत नाही? अन्य विषयांवर का भाजपा बोलत आहे? यावर बोललं पाहिजे."

महाराष्ट्राला विकासापासून दूर नेण्याचं भाजपाचं षडयंत्र

"भाजपाने मागील अडीच वर्षात हे सरकार या दिवशी पडेल, या तारखेला पडेल, या वेळेला पडेल असे अनेक मुहूर्त सांगितले. अनेक दिवस सांगितले. अनेकदा सरकार पडेल म्हणून देखील घोषणा केल्या. सर्व प्रकारे प्रयत्न करून देखील हे महाविकास आघाडीचं सरकार दिवसेंदिवस मजबूत होत चाललं आहे. यातून भाजपाचे सगळे नेते हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. जसं मी पुन्हा येईन, पुन्हा येईन परंतु पुन्हा येता आलं नाही. तसं ते दिल्लीश्वरांना सांगून आले की काय, की आम्ही महाविकास आघाडीचं सरकार चार दिवसांत, आठ-दहा दिवसांत पाडू आणि ते सरकार त्यांना पाडता आलं नाही. म्हणून त्यांनी शेवटी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था सामाजिक स्वास्थ आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला विकासापासून दूर नेण्याचं, हे भाजपाच्या लोकांचं रचलेलं षडयंत्र आहे. यापेक्षा याला फार महत्व नाही", असंही भास्कर जाधव यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ : असा आहे 'अप्पा बळवंत चौकाचा' इतिहास…

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT