Latest

covid19 nasal vaccine : नाकाद्वारे कोरोना लस; भारत बायोटेकच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी जगात अद्याप कोणतेही ठोस औषध शोधलेले नाही. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी सध्या लस हे एकमेव शस्त्र आहे. अशा परिस्थितीत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारी लस उपलब्ध होणार आहे. भारत बायोटेकने या लसीबाबत तिसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून लवकरच ग्रीन सिग्नल मिळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. (bharat biotech covid19 nasal vaccine)

कोरोना विषाणू पुन्हा एकदा हळूहळू पाय पसरत आहे. पण आता याच्याशी लढण्यासाठी जगात अनेक लसी उपलब्ध आहेत, ज्या विषाणूवर प्रभावी आहेत. या यादीत लवकरच भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येणा-या लसीचे नाव जोडले जाऊ शकते.

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही नाकाद्वारे देण्यात येणा-या लसीची तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. कंपनी पुढील महिन्यात आपला डेटा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडे सादर करेल. (bharat biotech covid19 nasal vaccine)

डॉ. कृष्णा पुढे म्हणाले की, आम्ही नुकतीच चाचणी पूर्ण केली आहे, आता त्यातील डेटाचे विश्लेषण केले जात आहे. पुढील महिन्यात, आम्ही DGCI ला डेटा उपलब्ध करून देऊ. जर सर्व काही ठीक झाले तर आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे. यानंतर ही नाकाद्वारे दिली जाणारी लस बाजारात आणली जाईल. त्यानंतर ही जगातील पहिली वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (bharat biotech covid19 nasal vaccine)

व्हिवा टेक्नॉलॉजी 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी डॉ. कृष्णा पॅरिसमध्ये होते, जिथे त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे त्यांनी आता बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे यावर भर दिला.

ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने या वर्षी जानेवारीमध्ये भारत बायोटेकला नाकाद्वारे दिल्या जाणा-या कोरोना लसीवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली.

लस अधिक प्रभावी…

सामान्य लसीपेक्षा नाकाद्वारे दिली जाणारी लस अधिक प्रभावी आहे. कोरोना विषाणूचे नाकावाटे संक्रमण अधिक होते, त्यामुळे भारत बायोटेकच्या या लसीद्वारे प्रथम नाकात अँटीबॉडीज तयार केल्या जातील. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत विषाणू पोहोचणे कठीण होईल, असा संशोधकांकडून दावा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT