इंदोरी : मावळ तालुक्यातील तळेगाव चाकण रस्त्यालगत इंदोरी-सुदवडी गावच्या हद्दीत असलेला श्री क्षेत्र भंडारा डोंगर सध्या पर्यटकांना खुणावत आहे. या ठिकाणी असलेल्या निरनिराळ्या वृक्षराजीने हा परिसर अधिकच बहरला आहे. या ठिकांचे दृश्य पावसाळ्यात हिरवळीने नटलेले असते. देहू आळंदीला आलेले भाविक भंडारा डोंगरावर आवर्जून भेट देत असतात; तसेच पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पर्यटकांची पावले सुद्धा या डोंगराकडे वळू लागली आहेत.
मावळातील सगळा परिसर हिरवागार झाला असून जणू धरणीमाता हिरवा शालू नेसून नटली असल्याचा भास होतो आहे. त्याचीच भंडारा डोंगर जणू महानतेची साक्ष देत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले होत असल्यामुळे भंडारा डोंगर परिसर हिरवागार झाला असुन पावसाच्या पाण्यामुळे भोवतालची झाडे बहरली आहेत. रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. कधी कधी मनात धडकी भरवणारा असा सोसाट्याचा वारा देखील मन मोहून जातो. हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, थंड वातावरण, अशा सर्व गोष्टीनी वेढलेला भंडारा डोंगर पर्यटकांना खुणावतो आहे.
अनेक पर्यटक या सर्वांचा आनंद लुटताना दिसत आहेत. पर्यटकांची व भाविकांची गर्दी लक्षात घेता शासनाने या ठिकाणी रस्त्याचे काम करून संरक्षण कठडे बसविले आहेत. डोंगर परिसरात मोर, ससे, माकडे यांचा वावर बर्यापैकी असुन डोंगरावरील हिरव्यागार झाडांमुळे श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे तसेच हा डोंगर पर्यावरण प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. डोंगराव मंदिराचे बांधकाम सुरु असून, ते पाहण्यासाठी देखील पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणावर याठिकाणी येत असतात. मावळ तालुका परिसरातील निसर्ग बहरला असून, पुणे तसेच मुंबई परिसरातील पर्यटक वर्षाविहाराचा तसेच येथील निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आता गर्दी करू लागले आहेत.