सातारा; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वात उंच असलेला भांबवली- वजराई धबधबा फेसाळू लागला आहे. हा धबधबा पर्यटकांना पाहण्यासाठी आजपासून खुला होत आहे. भांबवली, वजराई हा परिसर डोंगराळ असून घनदाट झाडीचा आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी जांभ्या दगडाची पायवाट करण्यात आली आहे.
पर्यटकांना हिरव्यागर्द झाडीतील धुवांधार पावसाचा व धबधब्याचा थ्रीलींग अनुभव घ्यायचा असेल तर जुलै व ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट दिली पाहिजे. भांबवलीतील आताचे वातावरण मनोरम आहे, धुवांधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लीत होते.
भांबवली वजराई धबधब्याला दि. 5 जानेवारी 2018 रोजी क वर्ग पर्यटन म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर धबधब्याच्या विकासाचे काम चालु झाले. घनदाट जंगल व दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागते. ही कसरत पहिल्या टप्यातील पायर्या व रेलिंग केल्याने दुर झाली आहे. दुसर्या टप्यात वॉच टॉवर व पॅगोडाचे काम झाले असून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. तिसर्या टप्यातील बाम्बु (गेस्ट) हाऊसचे काम चालु असून लवकरच पुर्णत्वास जाईल व पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल.
पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्याची पर्वणी ठरणारा हा मौसम आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेला हा परिसर पर्यटन विकासामुळे खुलायला लागला असून पर्यटकांना खुणावत आहे. भांबवली हे अलिकडेच प्रसिध्दीस आलेले एक निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ आहे. भांबवली वजराई धबधबा व भांबवली पठार ही येथील प्रमुख प्रेक्षणिय स्थळे आहेत. हा संपुर्ण परिसर दाट जंगल व विपुल निसर्ग संपदेने नटलेला आहे. आगामी काळात मंगळावरील अनुभवासारखा भास होणार्या भांबवली पठाराचा सुध्दा जागतिक पातळीवर लौकिक होईल व पूर्ण परिसाचा पर्यटन विकास होईल, अशी आशा स्थानिकांना लागून राहिली आहे.